Breaking News

उध्दव ठाकरे यांचा टोला, आता कर्नाटकसाठी महाराष्ट्रातील गावे पळवणार का? गुजरातमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून एकाबाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा सातत्याने अवमान केला जात आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील उद्योग पळवून नेले जात असताना कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला जात आहे. या घडामोडींच्या विरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मोदी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की, गुजरातच्या निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्यात आले. गुजरातमध्ये भाजपाने पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळविलेल्या विजयात या महाराष्ट्रातून नेलेल्या उद्योगांचे योगदान असल्याची खोचक टीका करत आता कर्नाटकातील निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील गावे तोडून नेतील अशी भीती वाटत असल्याचे म्हणाले.

महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात होती. याबैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजपावर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, सातत्याने महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान केला जात आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजुने महाराष्ट्र तोडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या गावांवर आता बाजुच्या राज्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली आहे. या विरोधात १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होईल आणि सीएसटीपर्यंत हा मोर्चा असणार आहे. मला खात्री आहे, की आहे की हा मोर्चा न भूतो ना भविष्यते असा होणार आहे.

गेल्या वेळी गुजरात हिमाचल आणि दिल्ली महापालिका या तीन निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपाने विजय मिळवला होता. मात्र, यंदा हिमाचलमध्ये काँग्रेस, दिल्ली महापालिकेत आप आणि गुजरातमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. मात्र, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचेही योगदान आहे, हे विसरून चालणार नाही असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ज्याप्रकारे महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आले, त्याप्रकारे कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन महाराष्ट्रातील गावंही तोडतील की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच महाराष्ट्रद्रोह्यांना आवरले नाही, तर महाराष्ट्र छिन्न-विछिन्न करायलाही हे मागेपुढे बघणार नाही. त्यांच्या मनात जे विष आहे, ते आता जगजाहीर झालं आहे. त्यामुळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्यांनी १७ तारखेला मोर्चात सहभागी व्हावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *