दरवर्षीप्रमाणे बारामतीतील गोविंद बागेत दिवाळी पाडव्या निमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्त्ये आले होते. त्यावेळी अनेकांच्या शुभेच्छा स्विकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, जन्माने मी ज्या जातीत जन्माला आलो. ती जात मी कधीही लपविली नाही. मात्र जातीच्या आधारे मी राजकारण आणि समाजकारण कधी केले नाही. त्यामुळे मला माझी जात सांगितली नाही. तरीही माझी जात सगळ्यांना माहित आहे. मध्यंतरी काही लोकांनी माझ्या नावापुढे ओबीसी जात असल्याचे लिहिलेले प्रमाणपत्र व्हायरल केले. पण मी कोणत्या जातीचा आहे हे सर्वांना माहित आहे असा खुलासाही केला.
लोकसभा निवडणूकीच्या आधी भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु करण्यात आली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक होत आहेत. त्या निवडणूका झाल्यानंतर आम्ही महाविकास नेत्यांनी भेटायचे ठरविले आहे. त्यामुळे या पाच राज्यात काय निवडणूका झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, काहीजण आजारी असल्याने आले नाहीत असे सांगण्यात येत आहे. मात्र ते आले काय आणि नाही आले काय काय फरक पडतो असेही म्हणत अजित पवार यांच्या गैरहजेरीवर भाष्य करण्याचे टाळले.
त्याचबरोब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुंब्र्यातील कार्यालय पाडल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार म्हणाले की, राज्याच्या प्रमुखाने सर्वांना सोबत घेऊन जायचे धोरण असले पाहिजे. ते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) पूर्वी ज्या पक्षात होते. त्या पक्षातून आता वेगळे झाले आहेत. त्यांच्याकडून ठिकठिकाणी कार्यलये उभी करण्याचे काम सुरु आहे. तसेच नवी कार्यालये उभी करण्याचे कामही सुरु आहे. परंतु त्यांनी ते कार्यालय अशा पध्दतीने पाडण्याची गरज नव्हती आणि त्यांच्या पूर्वीच्या नेत्याच्या कार्यालयाची जागा बळकाविणेही योग्य नाही. उलट ते आता राज्याच्या प्रमुख पदी आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालायला पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
मध्य प्रदेशमधील प्रचारा दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी तेथील जनतेला राम मंदीराचे मोफत दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, राम मंदीर उभारले गेले, तसेच त्या मंदीरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सरकारने कोणती व्यवस्था करण्याची गरज नाही. असे असताना त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे असून लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला कोठेही आणि कोणत्याही ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकिचे असल्याची भूमिकाही मांडली.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, हो आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होते. राज्यातील अपुरा पाऊस, शेतकरी आणि शेतपिकांवर आलेले संकट आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना भेटून काही सूचना केल्या. तसेच पुढील दोन-चार दिवसात यावर काही तरी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांमध्ये जवळपास टक्के ७० टक्के तरूण होते. त्यामुळे ते ज्या भावनेने आणि भावी जीवनाच्या अपेक्षेने आले त्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
तसेच मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, या आरक्षणाच्या प्रश्नावार निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आहे. त्यामुळे याबाबत आमचे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करू. पण याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मात्र सरकारला असल्याचे स्पष्ट केले.