Breaking News

अमित शाह यांचा उध्दव ठाकरेंना इशारा, …तर पोलखोल होईलः कॉमन सिव्हिल कोड आणणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील हे ठाकरेंनीच मान्य केले

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी नांदेड येथील गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, अमित शाह यांनी नांदेड येथील जाहिर सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच गेल्या नऊ वर्षाच्या काळात भाजपावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असा दावा अमित शाह यांनी करत उध्दव ठाकरे यांना चार जाहिर प्रश्न विचारले. जर या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत तर तुमची जनतेत पोलखोल होईल असा इशाराही दिला.

नांदेड येथील सभेतून अमित शाह यांनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. २०१९ च्या निवडणुकीत जर एनडीए सरकारला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, हे उद्धव ठाकरे यांनी स्वत: मान्य केलं होतं, असा खुलासा अमित शाह यांनी केला.

अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले, भारतीय जनता पार्टीने प्रत्येक क्षेत्रात विकास केला आहे. आज मी खास महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रात अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आहे. ‘धनुष्यबाण’ही शिवसेनेला परत मिळाला आहे. त्यामुळे कोणती शिवसेना खरी आहे? हेही स्पष्ट झालं.

आज मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यासाठी आलो आहे की, मी भाजपाचा अध्यक्ष होतो, तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. २०१९ मध्ये ‘एनडीए’ला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, हे उद्धव ठाकरेंनी मान्य केलं होतं. पण जेव्हा निकाल लागला आणि एनडीए जिंकली, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपलं वचन तोडलं. ते सत्तेसाठी ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, अशा शब्दांत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं.

मी उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो, हिंमत असेल तर आपली भूमिका स्पष्ट करा. ट्रिपल तलाक हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यावर आपण सहमत आहात का नाही? अयोध्येत राम मंदिर बांधलं जात आहे. त्यावर तुम्ही सहमत आहात की नाहीत? राम जन्मभूमीवर मंदिर बनलं पाहिजे की नाही? भाजपाचे अनेक सरकार कॉमन सिव्हिल कोड आणण्याचा विचार करत आहे. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्हाला कॉमन सिव्हिल कोड हवं की नको?, असे प्रश्न अमित शाह यांनी ठाकरेंना विचारले.

मी उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो की, मुस्लिम आरक्षण सुरू व्हायला नको. मुस्लिम आरक्षणाला संविधानाची संमती नाही. धर्माच्या मुद्द्यावरुन आरक्षण मिळू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की, मुस्लिम आरक्षण हवं की नको? मी उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो की, कर्नाटकात ज्यांचं सरकार बनलं त्यांच्यासोबत तुम्ही आहात. ते वीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकातून काढू इच्छितात. त्यावर आपण सहमत आहात की नाहीत?, असा सवाल अमित शाह यांनी केला.

उद्धव जी तुम्ही दोन जहाजांवर तरंगू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर उत्तर द्या. त्यातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुमची पोलखोल होईल, अशी टीका शाह यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही त्यांचं सरकार तोडलं. आम्ही नाही तोडलं. उद्धवजी शिवसैनिक आपल्या शिवसेनाविरोधातील भूमिकेमुळे त्रस्त झाला होता. शिवसैनिक शरद पवार यांच्या नीतीसोबत चालायला तयार नव्हता. त्या लोकांनी तुमचा पक्ष सोडला आणि तुमचं सरकार पडलं. दगा देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. भाजपासोबत निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या मांडीवर जावून बसले, अशा शब्दांत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

राज्यातील काँग्रेसची पडझड रोखण्यासाठी २८८ विधानसभा मतदारसंघात २५२ निरिक्षक

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याचे काम सध्या भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *