Breaking News

मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का, महंत सुनिल महाराजांचा शिवसेनेत प्रवेश संजय राठोड यांचा पराभव अटळ

बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. एका महिलेच्या आत्महत्येस जबाबदार असल्याच्या आरोपा वरून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करा म्हणून मागणी करणारे महंत सुनिल महाराज आघाडीवर होते. संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे बंजारा समाजावर छाप असलेल्या संजय राठोड यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी या पुर्वी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. परंतू शिवसेनेशी बंडखोरी करत संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.त्यांच्या सोबत महंत सुनिल महाराज सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसापासून सुरू होती. या चर्चेला पुर्ण विराम देत त्यांनी अखेर आज मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे यांनी महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन बांधत त्यांचे स्वागत केले.

यावेळी महंत सुनिल महाराज यांचे सोबत शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा खरपुस शब्दात समाचार घेतला.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मला आनंद आहे. साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा. असं जे बोललं जातं ते अगदी खरं आहे. आता नवरात्री सणातच महंत सुनिल महाराज इथे आले आहेत. बंजारा समाजाचे कडवट सैनिकही त्यांच्यासोबत आहेत.याचा मला खरोखर आनंद आहे.

मध्यंतरी आम्ही संजय राठोडांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा लक्षात आलं की ज्यांनी न्याय दिला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसोबत आपण जाऊ शकत नाही. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेनं ते शिवसेनेत आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे याचं भवितव्य घडवण्याची. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. पोहरादेवी दर्शनासाठी मी जरूर जाईन,असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी महंत सुनिल महाराज म्हणाले की, संजय राठोडांसोबत आम्ही होतो. तेव्हा ते शिवसेनेत होते आता आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेतच आहोत. पक्षप्रमुख ठाकरे यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकरलं आहे. आम्ही सुद्धा महाराष्ट्रात दौरा करणार आहोत. १७ नोव्हेंबरला शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. तेव्हा पूर्ण राज्यात बंजारा समाजातर्फे शिवसेवा संकल्प दौरा काढला जाणार असल्याचेही यावेळी महंत सुनिल महाराज यांनी सांगितले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *