यु एस मध्ये गेल्यानंतर प्रेसिडेन्शियल सुट जिथे यूएसचे प्रेसिडेंट किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतात अशा काही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही राहिलेत का ? तिथे तुम्हाला सोन्याचा चमचा आणि ताट यामध्ये जेवण वाढण्यात आले होते का ? आणि तो सोन्याचा चमचा परत भारतात घेऊन यायला तुम्हाला परवानगी दिली होती का ? कारण दिवसाला ६० लाख खर्च मंत्री नसताना तिथे होत असेल आणि त्या दौऱ्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही आणि (कौस्तुभ) दवसे नावाची व्यक्ती तिथे का गेली ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पवार, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर, ॲड. निलेश भोसले, पंकज बोराडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सरकारी आणि सरळ भरती परीक्षांमध्ये हजार रुपये हे गरीब मुलांकडून आईचे मंगळसूत्र विकून घेतले जात असतील आणि सरकारकडून सांगितलं जातं की पैसे नाहीत आणि दुसरीकडे दिवसाला ६०-७० लाख खर्च करतात, तर यातून काय समजावे असा सवाल करत राज्याच्या मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर कोट्यावधींचा खर्च केल्या जात असल्याचे रिपोर्ट हे आमच्याकडे आहे. त्यातून काय सिद्ध झाले हे आपण सर्वांनी पाहिलेलेच आहे. तर मग या सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून सरकारी परीक्षांसाठी एवढी फी का आकारली जात आहे ? असा सवालरही उपस्थित केला.
तलाठी परिक्षा भरतीतील घोटाळ्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, तलाठी भरती परीक्षेत झालेला घोटाळा आणि त्यावर सरकारचे काहीच न केलेले फक्त वेळ हे सर्व काही सांगून जाते अशी टीका करत तलाठी भरतीमध्ये १३० कोटी रुपये हे गोळा केले गेले. त्यामध्ये १० लाखांहून अधिक मुलांनी तिथे फॉर्म भरलेले होते पण त्यामध्ये बराच मुलांना लांबचे सेंटर हे मुद्दामून दिले गेले, त्यामुळे फक्त साडेआठ लाख मुलांनी त्या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आणि या भरती प्रक्रियेचा पेपर फोडणारा इसम हा पोलीस असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोपही केला.
राज्यातील प्रकल्प गुजरात पळविले जात असल्याप्रश्नी रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ५ लाख तरुणांना नोकरीच्या संधी मिळणार होत्या, ते सर्व प्रकल्प गुजरातला नेले. राज्यातले सरकार हे गुजरातच्या मदतीचे सरकार आहे असे म्हणायला हरकत नाही. केंद्रातले मोठ-मोठे नेते हे गुजरातला प्रकल्पांसाठी इन्व्हेस्टमेंट करत असल्याचे चित्र सर्वांच्या समोर आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी कालच वक्तव्य केलं की, गुजरात हे देशातले विकासाचे इंजिन आहे असे वक्तव्य केल्याची आठवणही करून दिली.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले, कॅगच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींची चौकशी जसं की, शासकीय पैशावर एमआयडीसीच्या पैशावर हे जे काही पर्यटन झालेले आहे. त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे करणार असल्याचे सांगत युवा संघर्ष यात्रेदरम्यान सर्वसामान्य नागरिक व युवा वर्गाने उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे काय मत आहे यासंबंधीचे पत्र आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलेले आहे त्या पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा आहे असेही सांगितले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसीमध्ये जो काही वायफळ खर्च केला जात आहे त्याची कॅगच्या माध्यमातून चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी करत राज्यात गुंतवणूक आकर्षित होण्यासाठी नियोजित झालेले परदेश दौरे व कार्यक्रमाबाबत कॅगच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घराणेशाहीच्या आरोपावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, आज भाजपामध्ये सर्वात जास्त घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत असा उपरोधिक टोलाही लगावला.
अटल सेतू प्रकल्पाच्या उद्घाटनावरून रोहित पवार म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांचे सेतूला नाव दिले गेले याचा आम्हाला आदर आहे, परंतु काल अटल साहेबांचा एकही फोटो दिसला नाही आणि त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांची आम्हाला कमी भासली असा खोचक टोलाही लगावला.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, यापूर्वीची अजित पवार यांची भाषण आणि त्याचे टाईमिंग आपण बघितले. पण कालच्या कार्यक्रमात भाजपामधल्या कोणी तरी त्यांच्या भाषणाचं स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखं ते बोलत होते. आणि ते ही फार कमी वेळ.