Breaking News

राज्याने ९ टक्क्याचा विकास दर गाठला समृद्ध, बळकट महाराष्ट्र घडविण्याची राज्यपालांची जनतेला साद

मुंबई : प्रतिनिधी

मागील ४ वर्षांमध्ये राज्याने ९ टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला असून  राज्याच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्राने १२.५ टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषीक्षेत्रातील गुंतवणूक ३० टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषीक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दुग्धव्यवसाय प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असल्याचे सांगत संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली बांधिलकी आपण दृढ करूया आणि एक समृद्ध, बळकट महाराष्ट्र घडवण्याचा निश्चय करूया अशी साद राज्यातील जनतेला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज घातली. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेस त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विविध शासकीय विभाग, सेना दल, पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल राव म्हणाले की, कर्जबाजारी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा देण्याच्या हेतूने शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. त्याद्वारे २३ हजार १०२ कोटी रुपये इतकी रक्कम ४७ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागील दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ११ हजाराहून अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. त्या अभियाना अंतर्गत सुमारे ४ लाख २५ हजार कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याद्वारे १६.८२ टीसीएम इतक्या क्षमतेचा जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना” या अंतर्गत ३१ हजार ५४९ धरणांमधील गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे २ हजार धरणांतून ९२ लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. “मागेल त्याला शेततळे” योजनेअंतर्गत ५६ हजारांहून अधिक शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात गुंतवणूक वाढीसाठी देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राला सर्वात अधिक पसंती दिली असून एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये राज्याला १.३ लाख कोटी रुपये इतकी थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य शासनाने अलिकडेच महिला उद्योजिकांना समर्पित औद्योगिक धोरणास मंजुरी दिली आहे. राज्याने फेब्रुवारी महिन्यात पहिली जागतिक गुंतवणूक शिखर परिषद “मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018” आयोजित केली आहे. या शिखर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल,गुंतवणूक प्रक्रिया सुलभ होईल आणि  “मेक इन इंडिया” कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळणार असल्याची आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विविध दलांचे संचलन

याप्रसंगी विविध दलांनी संचलन केले. भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल,मुंबई रेल्वे पोलीस दल, सशस्त्र गृहरक्षक दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महापालिका सुरक्षा दल, वन विभाग, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, सी कॅडेट कोअर, रोड सेफ्टी पेट्रोल (आरएसपी), भारत स्काऊट आणि गाईडस, ब्रास बँड पथक, पाईप बँड,बृहन्मुंबईतील वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक आदी पथकांनी यावेळी संचलन केले. रक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, मार्क्समन बुलेटप्रुफ व्हॅन, महिला सुरक्षा पथक व्हॅन, महारक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, वरुण वॉटर कॅनन, अग्निशमन दलाचे जलद प्रतिसाद पथक, अग्निसुरक्षा पालन कक्ष वाहन, ९० मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आदी वाहनांचा संचालनात समावेश होता.

चित्ररथातून विविध संदेश

राज्य शासनाच्या विविध विभागांनी त्यांच्या कामगिरीचे यावेळी चित्ररथाच्या माध्यमातून सादरीकरण केले. एसआरए, महानिर्मितीची मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना, भूजल पाण्याचे जतन आणि संवर्धन, ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय, एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, ७ लाख कुटुंबाना घरे मिळवून देणारे म्हाडा, मेट्रो रेल्वे – प्रवास सुखाचा मुंबईकरांचा, मनरेगातून समृद्ध महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, जाती विरहित महाराष्ट्रासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन, उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या संकल्पनांवर आधारित चित्ररथांनी आपले सादरीकरण केले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *