Breaking News

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमचं टार्गेट ठरलेलं आहे…ती युती आता राहिली नाही

आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपाला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी जाहिर केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला चार जागा कधीच ऑफर करण्यात आल्या नाहीत. तीन ऑफर केल्या होत्या, त्यामध्ये एक अकोला होती. ती आम्ही त्यांना परत घ्यायला लावली. त्यामुळे आमच्याकडे दोनच जागा त्यांनी दिल्या होत्या. आम्ही जे म्हणतो, ते कोणीच ऐकून घेत नाहीत. मात्र, संजय राऊत जे म्हणतात, त्यावरच चर्चा होते अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत झालेल्या चर्चेमधूनच लक्षात आले की, यांच्यामध्ये पंधरा जागांवर भांडण आहे. त्यामुळे या पंधरा जागा तुम्ही फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेवर तुम्ही काय करणार, याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. तो झाल्यावरच आम्ही बोलू शकतो, त्यांच १५ जागांच कोडं उलगडलं की ठरवणार, असेही यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिढा मिटणार नसेल, तर आमची एन्ट्री करून काय उपयोग? आम्ही २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. आम्ही काँग्रेसला सात जागा कळवल्या आहेत. तसेच, काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आणि नाना पटोले यांना पत्रही दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सात जागांवर एकमत झाले हे एका अर्थाने बरे झाले, असेही सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,कॅबिनेट डिसिजनला कोर्ट किंवा चौकशी एजन्सीही चौकशी करु शकत नाही. मात्र, याला मनी लॉड्रींगचे रुप देण्यात आले आहे. यामुळे हे पक्षपातीपणा आणि राजकारणाची गोष्ट आहे. म्हणून सामान्य लोकांना माझं आवाहन आहे, आज केजरीवाल आहे. उद्या ही वेळ आपल्यावरही येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर या सरकारला बाहेर काढणं महत्वाचं असल्याचे आवाहनही यावेळी केले.

दरम्यान, प्रसार माध्यमांनी शिवसेना उबाठा गटाबरोबरील युतीबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ती युती आता राहिली नाही. महाविकास आघाडीत सहभागी होण्यापूर्वी शिवसेना उबाठाच्या नेत्यांशी युतीबाबत चर्चा करण्याचे आव्हान केले. तसेच वंचित आणि शिवसेनेतील युतीनंतरच महाविकास आघाडीशी चर्चा करू असे सुचविले होते. परंतु त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती युती आता राहिली नसल्याचे सांगितले.

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *