Breaking News

पैशाची मस्ती इथे चालणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

नाणार : प्रतिनिधी

कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत सगळेच जण शिवसेनेची भूमिका काय विचारतात. त्या सर्वांना सांगतो की नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून हा प्रकल्प तरीही इथे आला तर त्याची राख करू असा सज्जड दम राज्य आणि केंद्र सरकारला दिला.  पैशाच्या बळावर येतील शेतकऱ्यांची जमिन खरेदी करून सौदी अरेबियाच्या फायद्यासाठी इथल्या निसर्गाची आणि लोकांची राख रांगोळी करणार काय? असा सवाल करत तुमच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती इथे चालणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जमिन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठारे यांनी दिला.

मागील काही दिवसांपासून नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत हा प्रकल्प होवू नये त्यासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली.

त्या अनुषंगाने काँग्रेसचे एक शिष्टमंडळ दोनच दिवसांपूर्वी नाणार येथे जावून तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी चर्चा केली.

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे नाणार दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चाही केली. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, नाणार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाणार प्रकल्पाच्या प्रश्नासंदर्भात संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी हा प्रकल्प जनतेवर लादणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी त्यासंदर्भात करार करत हा प्रकल्प होणार असल्याचे जाहीर केले. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे दिल्लीत वजन नसल्याची टीका करून सौदी अरेबियाच्या फायद्यासाठी हा प्रकल्प आणणार असाल तर हा प्रकल्प होवू देणार नाही. हवे तर हा प्रकल्प गुजरातला न्या, नागपूरला न्या मात्र कोकणाला उध्दवस्त करणारा प्रकल्प इथे नको असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तसेच नाणार येथील स्थानिकांनी कोणत्याही गुजराती, मारवाडी लोकांना कितीही पैसे दिले तरी शेतजमिन न विकण्याचे आवाहन करत स्थानिकांकडून तसे वचनही त्यांनी यावेळी घेतले.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठी जमिन भू-संपादनासाठी राज्य सरकारकडून काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करत यापुढे कोणतीही मोजणी नाणार येथे होणार नसल्याचे जाहीर केले.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *