Breaking News

नाना पटोले यांची खोटक टीका, …शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे. मंत्र्यांनी दौरे करावेत पण आधी शेतकऱ्याच्या हातात भरीव मदत द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही वाया गेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे, शेतातील उभी पिके, द्राक्ष, संत्रा, कांदा, सोयाबिन, तूर, धान, कापूस सर्व पिकं वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असताना सरकारने तात्काळ मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहवण्याचे काम केले पाहिजे पण सरकार मात्र पोकळ घोषणा करत आहे. याआधी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करत राहिल.

मराठा-ओबीसी वाद सरकारचा ठरलेला कार्यक्रम

मराठा ओबीसी वादावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपानेच आरक्षणाचे आश्वासन दिले होते, पण आता ते आरक्षण देण्यास चालढकल करत आहेत. आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम भाजपा करत आहे. आरक्षण प्रश्नावरून मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भांडणे ही सुद्धा सरकारचा ठरवून सुरु असलेला कार्यक्रम आहे. ही सर्व नौटकी सुरु असून राज्यातील जनतेला हे माहित आहे. सर्व जातींना आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यासाठी जातनिहाय जनगणना केली पाहिजे पण भाजपा सरकार ही जनगणना करत नाही.

शिक्षकच नाहीत तर ‘आदर्श शाळा’ कसली?

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात १.२५ लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, पण सरकार त्या जागांची भरती करत नाही. भाजपा सरकार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करत आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नावाने आदर्श शाळा उपक्रमाची घोषणा करत आहे, हा सर्व हास्यास्पद प्रकार आहे. शाळेत शिक्षकच नाहीत तर आदर्श शाळा कसली? असा सवालही उपस्थित केला.

पाच राज्यात काँग्रेसच विजयी होणार….

सध्याच्या विधानसभा निवडणूकीबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगाना व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून काँग्रेस पक्षाला या पाचही राज्यात जनतेचे मोठे समर्थन लाभले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी या राज्यात झंझावाती प्रचार केला. पाचही राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकुल आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष या पाचही राज्यात बहुतमाने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

नाना पटोले यांची मागणी, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा जाहीर करा

मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *