Breaking News

महाविकास आघाडीचे वंचितला निमंत्रण, पण प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या प्रमुख विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सहभागी करणार की नाही यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूका जाहिर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नरिमन पाँईट येथील हॉटेल ट्रायडंड येथील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवित निमंत्रण दिले. मात्र त्या निमंत्रणाच्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सही केल्याने प्रकाश आंबेडकर यांनी पटोले यांनाच थेट सवाल करत तुम्हाला आघाडी करण्याचे आणि जागा वाटपाचे अधिकार दिले आहेत का असा सवाल केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीने पाठविलेल्या निमंत्रणाच्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील आणि शिवसेना (उबाठा) चे नेते म्हणून खासदार संजय राऊत यांची सही आहे. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सही केल्याचे उपलब्ध पत्रावरून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना अधिकार आहे का असा सवाल केला.

दरम्यान, यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज तब्बल ६ तास जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या चर्चा करताना संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला रितसर महाविकास आघाडीचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. पण पुढील ३० जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहतील असे सांगत यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी योग्य ती चर्चा सुरु असल्याचेही सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात. तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की, काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा INDIA आघाडीच्या युतीसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत असे स्पष्टपणे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, AICC किंवा काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रात युतिसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का? काल औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षांच्या अध्यक्ष, म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार व मल्लिकार्जुन खर्गे, यांची सही असायला हवी. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) व काँग्रेस यांच्या अध्यक्षांच्या सहिनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या. किंवा रमेश चेन्नीथला, राहुल गांधी, सोनिया गांधी अथवा मल्लिकार्जुन खर्गे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ असे सांगत महाविकास आघाडीच्या बैठकीत एकप्रकारे सहभागी होणार नसल्याचे अप्रत्यक्ष स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *