Breaking News

नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्यावरील उपचाराचा खर्च काँग्रेस करेल राहुल गांधींबद्दल हेमंत बिस्वा शर्मांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध

मराठी ई-बातम्या टीम

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

राहुल गांधी यांच्यावरील हेमंत बिस्वा शर्माच्या वक्तव्याचा निषेध करत पटोले म्हणाले की, बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे आहे. राहुलजी गांधी यांच्याबद्दल त्यांनी काढलेले वक्तव्य हे त्यांची पातळी दाखवून देणारे आहे. भाजपातील वरिष्ठ नेत्यांपासून अनेक नेत्यांना विरोधकांवर अशी वयैक्तिक टीका करुन त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दलही हीनदर्जाचा शब्दप्रयोग भाजपा नेत्यांनी वारंवार केला आहे. त्यांची हीच संस्कृती आहे. मात्र काँग्रेसची ही संस्कृती नाही. बिस्वा शर्मा यांना या रोगापासून आराम पडो अशी आमची सदिच्छा आहे. बिस्वा शर्मा यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत त्यांचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोमणाही  त्यांनी मारला.

लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. त्यामुळे एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला. भाजपाने त्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. परंतु भाजपा हा लोकशाही व संविधानाला मानत नाही. भाजपाचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असतात. बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत, बोलताना काही ताळतंत्र बाळगण्याची आवश्यकता असते. मात्र त्यांच्यावरचे संस्कारच तसे आहेत. देव त्यांना सदबुद्धी देवो हीच आमची सदिच्छा, असेही ते म्हणाले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *