Breaking News

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात सर्वाधिक अग्रभागी बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद सुप्रिया सुळे विरूध्द -भावजय तथा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत होणार आहे. त्यानंतर आता सर्वाधिक रंजक लढत होणार आहे ती माढा लोकसभा मतदारसंघात.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर लोकसभा मतदारसंघ वगळून त्या ठिकाणी माढा हा नवीन लोकसभा मतदारसंघ मागील डिलीमीटेशच्या वेळी निर्माण करण्यात आला. या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील काही भाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांबरोबरच सातारा जिल्ह्यातही संपर्क ठेवावा लागतो. मात्र २०१४ आणि २०१९ ला भाजपाला मिळत असलेल्या लाटेवर स्वार होत भाजपामधून हिंदूराव निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात वरचष्मा राहिलेल्या मुळच्या राष्ट्रवादीच्या पण आताच्या भाजपासोबत असलेल्या मोहिते-पाटील गटाने मधल्या काळात भाजपासोबत जुळवून घेत हिंदूराव निंबाळकर यांना लोकसभेवर निवडूणही पाठविले.

परंतु यंदा मात्र भाजपाचे खासदार हिंदूराव निंबाळकर यांच्या विरोधात वातावरण असतानाही भाजपानेही यावेळी पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील मोहिते पाटील गट आणि सातारा जिल्ह्यातील फलटण, माण-खटाव तालुक्यातील रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्टपणे विरोधाची भूमिका घेतली. त्यातच मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते-पाटील हे काहीसे उपेक्षित राहिले होते. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. परंतु उमेदवार आधीच जाहिर झाल्याने अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेशासाठी हालचाली सुरु केली.

या हालचालीचा परिपाक म्हणून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत यावेळी चर्चा केली. त्यानंतर १४-१५ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होऊन लगेच दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे एकाबाजूला भाजपाचे हिंदूराव निंबाळकर आणि निंबाळकर यांना निवडूण लोकसभेवर पाठविण्यात मोठा हातभार असलेल्या मोहिते पाटील गटाकडून आता त्यांच्याच घरातून उमेदवार पुढे केल्याने आता माढा लोकसभा मतदारसंघात चुरसीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात धैर्यशील मोहिते-पाटील यांना शरद पवार यांच्या भेटीनंतर विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबियांचे राजकारणापेक्षा वेगळे नाते आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो होतो असे सांगत सध्याच्या माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत विचारले असता वेट अॅण्ड वॉच अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *