Breaking News

अजित पवार यांच्या नाराजीवर जयंत पाटील यांनी केले स्पष्ट, माझ्या सारख्या व्यक्तीने उत्तर देणे… राष्ट्रीय स्तरावर कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीयस्तरावर आज दोन कार्याध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नावाची घोषणा शरद पवारसाहेब यांनी केली आहे. या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या वाटचालीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

आज राष्ट्रवादी काँग्रेसने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून झेंडावंदन आणि कार्यकर्त्यांशी गाठीभेटी झाल्यावर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षातील नाराजी शोधण्याचा तुमचा एवढा जोरात प्रयत्न का सुरू आहे, हेच मला कळत नाही असा उलटा सवाल करत आज आमचा पक्षात आनंदाचा दिवस आहे. आमच्या पक्षात चांगले निर्णय झालेले आहेत. मोठ्या जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. माझी जबाबदारी महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. झेंडावंदन मी इथे केले. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतो कुठे असा प्रतिप्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना केला.

तसेच अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अजितदादांच्या उपस्थितीत हे निर्णय दिल्लीत झाले आहेत. अजितदादा कार्यक्रम संपल्यानंतर निघून आले. दादांच्या उपस्थितीत निर्णय झालेला असताना त्यावर शंका – कुशंका घेण्याचे कारण नाही. याचा अर्थ आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीयस्तरावर आता प्रयत्न सुरू आहे असे दिसते अशी मिश्किल टीप्पणी केली.

तसेच पुढे बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. एकमताने राष्ट्रीय स्तरावर दिल्लीत निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यस्तरावर काम करणार्‍या माझ्यासारख्या व्यक्तीने अशा प्रश्नांची उत्तरे देणे योग्य नाही. तरी देखील राष्ट्रीय स्तरावर आमचे स्थान होते. ती राष्ट्रीय मान्यता संकटात आली होती. या सगळ्यांना जबाबदारी देऊन पवारसाहेबांनी कामाला लावले आहे आणि वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर दिली आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय स्तरावरील पक्षाची मान्यता मिळेल यादृष्टीने आमचा पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे असेही स्पष्ट केले.

भाकरी परतवली नाही असे नाही तर लोकांवर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे असे स्पष्ट करतानाच एक नवीन टीम जबाबदारी घेऊन काम करायला तयार झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरुन जो निर्णय येईल तो राज्याला मान्य करावा लागतो. तुम्ही कितीही काही म्हटले तरी आम्ही एकमताने एकसंघ आहोत असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

Check Also

शशी थरूर यांचा विश्वास, देशभरातील हवा बदलली… जनतेच्या प्रश्नावर भाजपा गप्प

लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *