Breaking News

अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले, निवडीनंतर दोन लोक नाराज… १ टक्केही सत्य नसल्याचा शरद पवार यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केल्याची घोषणा शरद पवारांनी दिल्लीत केली. या नियुक्तीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दिल्लीतील पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, अजित पवार यांच्याबद्दल सुरु असलेल्या वृत्तांमध्ये १ टक्केही सत्य नाही. नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे. यातील एक म्हणजे जयंत पाटील… महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडं आहे. तर, अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे.

तसेच शरद पवार यांनी सांगितले की, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंची यांच्याकडं कोणतीही जबाबदारी नाही. वेळ देण्याची तयारी असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली. नाराजीच्या चर्चा चुकीच्या आहेत. आज करण्यात आलेल्या नियुक्तींबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर मागील एक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला, असं स्पष्ट केलं.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या सर्वाचं अभिनंदन केलं आहे. ट्वीट करत अजित पवार म्हणाले, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन, असं अजित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं.

Check Also

अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’च्या ५०० कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला ५०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *