Breaking News

पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात रंगला शाब्दिक कलगीतुरा छत्रपतींचे पुरावे चालत नाही अन् निझामाचे चालतात....

मराठा आरक्षणप्रश्नी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह राज्यातील कुणबी समाजातील सर्वांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला याच मुद्यावरून जालन्यातील आंदोलन आणखी उग्र करत वंशावळीचा मुद्दा काढून टाकण्याची मागणीही करण्यात आली. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मराठा आरक्षणावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, राज्य सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरावे चालत नाहीत, परंतु निजामाचे पुरावे चालतात असा खोचक टोला लगावला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिदेत ही टीका केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणावं, तुम्हीसुद्धा एकेकाळी चार वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होता, राज्याचे प्रमुख होता. टीका करणं फार सोपं असतं. हे जे कोणी टीका करत आहेत, ते कधी ना कधी राज्यात प्रमुख होते आणि आत्ता जे सत्तेवर आहेत ते आहेतच. यातून कोणीच सुटणार नाही.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझं स्पष्ट मत आहे की अशी एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालणार नाही. आपल्याला समंजस भूमिका घ्यावी लागेल. सरकारमध्ये असणारे आणि विरोधात असणाऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी. काहीजण म्हणतात केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे, अरे मग त्याआधी १० वर्ष मनमोहन सिंह सत्तेवर होते. १० वर्षे यूपीए सरकार होतं ना? त्यामुळे कोणी कोणावर दोषारोप करू नये. सर्वांनीच समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी. यामध्ये राजकारण आणू नये असे आवाहन केले.

अजित पवार म्हणाले, फक्त मीच चांगला आणि बाकीचे दोषी किंवा हा प्रश्न सोडवण्यात ते कमी पडत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न कोणीच करू नये. आज काहीजण पुढारलेपण करत आहेत, तिथे (अंतरवाली सराटी गावात, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी) जाऊन विरोधी पक्षनेते म्हणून भेटत आहेत किंवा दिखावा करत आहेत. त्यांच्यापैकी सगळेच जण वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर काम करत होते. त्यांना जेव्हा कोणी त्रयस्थाने विचारलं की तुम्ही जेव्हा त्या प्रमुख पदावर होता तेव्हा हा प्रश्न का सोडवला नाही. याचं त्यांच्याकडे काय उत्तर आहे? स्वतः पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतून आले होते ना? असा प्रतिसवाल करत राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांना निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अजित पवार यांच्या प्रत्युत्तरावर पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र आगामी काळात या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-कुणबी आणि ओबीसी वर्गात चांगलेच राजकिय आणि सामाजिक वाद विवाद घडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

काँग्रेसचे मराठवाड्यात येत असलेल्या पंतप्रधान मोदी यांना प्रश्न

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील सहभागी राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *