Breaking News

राहुल गांधी म्हणाले, नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान…. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडू असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस हा बब्बर शेर आणि शेरनिंयोका पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी फुटली, पण काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही. मोदी आणि आरएसएस काँग्रेसला घाबरतात. महाराष्ट्रातून भाजपाचा सफाया होणार आहे असल्याचा इशारा दिला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

यावेळी राहुल गांधी यांनी टिळक भवन मधील सोशल मीडियाच्या वॉर रूमचे उद्घाटन केले. राहुल गांधी म्हणाले की, मोदीजींनी काँग्रेस मुक्तचा नारा दिला होता. एके काळी जगातील महासत्ता असलेल्या इंग्लंडला काँग्रेसचा नायनाट करता आला नाही, उलट काँग्रेसने इथून पुढे त्यांना परत पाठविले. मोदीजींना वाटते की ते अदानीच्या पैशाने काँग्रेसचा नाश करतील, पण तसे होणार नाही. गुरुवारीच जगातील दोन आर्थिक वृत्तपत्रांनी लिहिले की, मोदीजींचे अदानीशी जवळचे संबंध आहेत, असा आरोपही केला.

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसमध्ये हिंमत नाही, असे मीडियात बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये हिंमत नसेल, तर कर्नाटकात भाजपाला कोणी मुसंडी मारली? तिथं कुणी साफ केलं? महाराष्ट्रात कोणता पक्ष उदयास आला? आमचा पक्ष फुटला नाही ना? महाराष्ट्रातून भाजपाचा सफाया होणार आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत, तिथे कर्नाटकमध्ये जे घडले तेच होणार आहे, असा दावा केला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, प्रसारमाध्यमे काहीही म्हणोत, काँग्रेस पक्षच निवडणूक जिंकणार आहे. पक्षात कमतरता आहे, ती दुरुस्त करावी लागेल. कार्यकर्ता आपले रक्त आणि घाम पक्षासाठी देतो, त्याचे बक्षीस आधी मिळाले पाहिजे. आपण द्वेषाने काम करू शकत नाही. आपण आपल्या शत्रूच्या घरी जाऊन त्यांच्या द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडतो. आमच्या पक्षात लोक हसत राहतात, पण संसदेत तुम्ही भाजपाचे खासदार गप्प बसल्याचे पाहिले असेल, चुकून हसले तर मोदी त्यांना मारतील, असे वाटते. त्यांचे काम द्वेष करणे, आमचे काम प्रेम करणे असून मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन छान वाटत असल्याचेही आवर्जून सांगितले.

यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, मोदी व त्यांच्या लोकांनी कटकारस्थान करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी सातत्याने गरिबांचा आवाज उठवत होते, बेरोजगारीवर आवाज उठवत होते, मोदींविरुद्ध आवाज उठवत होते म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी खासदारकी रद्द करण्यात आली पण राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली. संसदेत येताच राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारच्या गैर कारभारावर तुफानी हल्लाबोल केला. मोदी दिल्लीहून कर्नाटकात येऊन गल्लीबोळात फिरले पण कर्नाटकची जनता भुलथापांना कोणी बळी पडली नाही. आपण सर्वजण एक होऊन लढलो तर कोणीही आपला पराभव करु शकत नाही असेही स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, राहुल गांधी यांनी टिळक भवनला भेट दिली आहे. महाराष्ट्र नेहमीच काँग्रेस विचाराचा राहिलेला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष विजयी झाला पाहिजे असे सोनियाजी गांधी यांनी सांगितले होते व त्यांना मी शब्द दिला आहे की महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसला विजयी करेन. मी आपल्याला खात्रीने सांगतो की आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होऊन विधाभवनवर काँग्रेसचाच तिरंगा फडकेल.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व काँग्रेस कार्य समितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य राज्यसभा खासदार काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य गुरुदीप सप्पल, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, बसवराज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अमरजितसिंह मनहास, माजी मंत्री विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह वरिष्ठ नेते व आमदार पदाधिकारी उपस्थित होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *