मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पक्ष संघटनेत जबाबदारी मिळावी, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली. यानंतर प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना मिळावं, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षात केवळ चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी हवे आहेत. पदं देण्यासाठी नको, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. ते चंद्रपूर येथे भाजपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
ओबीसी नेत्यांना संधी देण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामान्य ओबीसी घरातील मुलगा आज देशाचा पंतप्रधान म्हणून संपूर्ण विश्वात भारताचा तिरंगा फैरावत आहे. यापेक्षा मोठा ओबीसींचा सन्मान काय असू शकतो. आपण कालही पाहिलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सगळे खासदार मोदींचं कशाप्रकारे स्वागत करत होते. त्यातून खऱ्या अर्थाने मोदींचा मान वाढलाच पण मोदींपेक्षाही भारताचाही मान वाढला. आज देशाच्या मंत्रिमंडळात जेवढे ओबीसी मंत्री आहेत, इतके ओबीसी मंत्री यापूर्वीच्या कुठल्याही मंत्रिमंडळात नव्हते. हा एक ओबीसी मंत्र्यांचा रेकॉर्ड मोदींच्या मंत्रिमंडळाने पूर्ण केला आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळं मी यासाठी सांगतोय. कारण भारतीय जनता पार्टीचा डीएनएच ओबीसी आहे. आजपर्यंत ओबीसींसाठी जे काही निर्णय झाले, ते निर्णय एकतर मी मुख्यमंत्री असताना झाले किंवा देशात पंतप्रधान मोदी यांनी केले. आपण ओबीसी मंत्रालय स्थापन केलं. ‘महाज्योती’ सारखी संस्था काढून ओबीसी मुलांसाठी पीएचडी, एमपीएससी, यूपीएससी करण्यासाठी दारं खुली केली. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली, अशी माहिती दिली.
🕣 8.30pm | 25-06-2023 📍 Chandrapur | रा. ८.३० वा | २५-०६-२०२३ 📍 चंद्रपूर.
LIVE | मोदी @ ९ भव्य जाहीर सभा.
Modi@9 Grand Public Meeting.@BJP4Maharashtra @narendramodi @Cbawankule#NarendraModi #9YearsOfSustainableGrowth #9yearsofseva #9YearsOfModiGovt https://t.co/K2nDipPsCR— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 25, 2023
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम देशात आणि महाराष्ट्रात भाजपा करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षात त्यांना फक्त चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी नेते हवे आहेत. पदं देण्यासाठी नको आहेत. पदं देताना तिथे कधी ओबीसीचा विचार होत नाही, अशी टीका केली.