Breaking News

तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते लोकसभा विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जून खर्गे यांची टीका

औसा : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते. पण दुर्दैवाने अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्र्यांना तो दिसून येत नाही. म्हणूनच राज्यात दुष्काळ नव्हे तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी बोचरी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा व दुष्काळ पाहणी दौऱ्याचा प्रारंभ करताना औसा येथील पहिल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. मधुकरराव चव्हाण, आ. नसीम खान, हर्षवर्धन पाटील, आ. अमित देशमुख, आ. बसवराज पाटील, आ. त्र्यंबक भिसे, आ. सुनिल केदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक नेते धीरज देशमुख, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी खा. अशोक चव्हाण व अन्य प्रमुख नेत्यांनी तुळजापूर येथे आई भवानीचा आशीर्वाद घेतला व त्यानंतर औसा येथील भरगच्च सभेला संबोधित केले. औसा येथील सभा संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व इतर नेत्यांनी तालुक्यातील चलबुर्गा येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
याप्रसंगी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीसंदर्भात बोलताना खर्गे यांनी भाजप व शिवसेनेच्या केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या सरकारच्या काळात महाराष्ट्रात १५ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. पण पंतप्रधानांनी कधीही शेतकऱ्यांसाठी राज्यात येऊन त्यांचे दुःख जाणून घेतले नाही. मुख्यमंत्री शेतकरी हिताचा आव आणतात. पण त्यांना साधी नांगरणी, पेरणी, वखरणी, कोळपणी तरी कळते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. म्हणूनच महाराष्ट्रात अद्याप दुष्काळ जाहीर झालेला नसल्याची टीका त्यांनी केली.
आपल्या घणाघाती भाषणात खा. मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली. सत्तेत आल्यापासून मोदींनी या देशाला केवळ बरबादीच्या मार्गावर नेले आहे. पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंगपर्यंतच्या पंतप्रधानांनी देशासाठी जे काम केले, त्यावर पाणी फेरण्याचे काम मोदी सरकारच्या काळात सुरू आहे. पंतप्रधानांनी आजवर खोटे बोलण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. विदेशातील काळा पैसा, प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रूपये, २ कोटी रोजगार अशा अनेक खोट्या घोषणा त्यांनी केल्या. मोदी म्हणजे खोट्यांचे सरदार आहेत. खोटे बोला पण रेटून बोला, हाच त्यांचा नारा आहे. खऱ्यालाही लाज वाटेल इतक्या ठामपणे ते खोटे बोलतात, अशा आरोपांच्या अनेक फैरी खा. खर्गे यांनी झाडल्या.
मोदी सरकारच्या काळात संविधानाला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील संवैधानिक संस्था धोक्यात आहेत. मी सांगेल तो कायदा अन मी करेल तो नियम, असा एककल्ली कारभार मोदींनी सुरू केल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनीही केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले. दुष्काळासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण लातूर जिल्ह्यात गंभीर दुष्काळ असताना शिरूर अनंतपाळशिवाय इतर कोणत्याही तालुक्यात दुष्काळ नसल्याचा जावईशोध या सरकारने लावला आहे. मुख्यमंत्र्यांना कोणता चष्मा लागला, ते आम्हाला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांना जवळचे दिसत नाही की दूरचे दिसत नाही, ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे. दुष्काळी आढावा बैठक घेताना मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत. फक्त अधिकाऱ्यांना बोलावून दुष्काळाची माहिती घेतात. मुळात यांच्या खिशात पैसे नाहीत. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला द्यायचे तरी काय, असा प्रश्न राज्य सरकार समोर आहे. म्हणूनच सरकार दुष्काळ जाहीर करीत नसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
या सरकारची काहीही कर्तबगारी नसल्याने आता त्यांचा भर केवळ जाहिरातबाजीवर आहे. ‘आपले सरकार, जाहिराती दमदार’ असा टोला लगावत खा. अशोक चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केलं. या सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. आज वर्ष उलटल्यानंतरही कर्जमाफीची रक्कम १२-१३ हजार कोटींवर गेलेली नाही. शेतकऱ्यांना नवे कर्जही मिळाले नाही. गावात विजेचा पत्ता नाही. तरीही हे सरकार प्रत्येक योजनेत ऑनलाइनचा हट्ट धरून बसते. वीज नसताना ऑनलाइन काम कुठून होणार, याची साधी जाणीव या सरकारला नसल्याने त्यांचा कारभार ‘ऑफलाइन’ झाल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधानांनाही टिकेचे लक्ष्य केले. नरेंद्र मोदींनी नुकतेच शिर्डीत येऊन पंतप्रधान आवास योजनेत काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात फक्त २५ लाख तर भाजप सरकारच्या काळात दीड कोटी घरे बांधल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने २.५ ते ३ कोटी घरे बांधली आणि मोदी सरकारच्या काळातील घरकुलांची संख्या काही लाखांच्यावर गेलेली नाही. या सरकारने किमान साईबाबांचा पायाशी येऊन तरी खोटे बोलायला नको होते. साईबाबांच्या चरणी येऊन खोटे बोलत असाल तर साईबाबांचा आशीर्वाद कसा मिळेल? अशीही विचारणा खा. चव्हाण यांनी केली.
सरकारच्या दांभिकपणावर टीका करताना त्यांनी राम मंदिराचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, मागील ४ वर्ष भाजप व शिवसेनेला राम मंदीर आठवले नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी त्यांना रामाची आठवण झाली आहे. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांनी पदयात्रा केली. पण महात्मा गांधींच्या विचारांचा आणि मुख्यमंत्र्यांच्या विचारधारेचा काही तरी संबंध आहे का? अशा प्रश्नांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर सरबत्तीच केली.
ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी मागील ७० वर्षात देशात काहीच न झाल्याच्या भाजपच्या आरोपाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर शेकडो राजे-रजवाड्यांमध्ये विभागलेल्या भारताला एकसंघ बनवण्याचे काम काँग्रेसने केले. या देशात लोकशाही प्रस्थापित करून ती टिकवून ठेवण्याचे काम काँग्रेसनेच केले. भारतासोबत स्वतंत्र झालेल्या शेजारच्या देशात आजवर अनेकदा लष्करी राजवट आली. पण काँग्रेसने लोकशाही मजबूत केल्यामुळे भारतावर तशी वेळ ओढवली नाही. या देशातील सामाजिक विषमता नष्ट करण्याचे कामही काँग्रेसनेच केले. काँग्रेसने जमिनदारी नष्ट केली. कधीकाळी अन्नधान्यासाठीही इतरांवर अवलंबून असलेला या देशाला शेतमाल उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण केले. देशातील प्रत्येकाला रोजगार मिळावा म्हणून त्याला नोकरी देणारे अन् नोकरीत स्थैर्य देणारे कायदे काँग्रेसने तयार केले. गरीबातल्या गरीब माणूसही उपाशी राहू नये, यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणला. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला भाव दिला. तरीही भाजपवाले ७० वर्षात काय झाले, असा प्रश्न विचारतात हे आश्चर्यकारक आहे. काँग्रेसने देशात मोठे काम केले म्हणूनच वर्षानुवर्षे लोकांनी काँग्रेसला निवडून दिले, असे शिवराज पाटील यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पुढील निवडणुकीत भाजप सरकार नेस्तनाबूत होणार असल्याचे सांगितले. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते, तेव्हा देखील पुढील २० वर्ष काँग्रेसचे सरकार येणार नाही, असा अंदाज काही विश्लेषक व्यक्त करीत होते. वाजपेयींच्या सरकारने देखील आजच्या सरकार प्रमाणेच ‘शायनिंग इंडिया’च्या नावाखाली जाहिरातींचा मारा चालवला होता. पण लोक सूज्ञ असतात. त्यांनी ते सरकार उलथवून लावले. त्याचप्रमाणे आजच्या सरकारबद्दल कोणी काहीही दावे करीत असले तरी पुढील निवडणुकीत हे सरकार आपला पराभव टाळू शकणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी केवळ लोकांची दिशाभूल करतात. व्यासपिठावर भाषणासाठी उभे झाले की जे वाट्टेल ते बोलत सुटतात. आपल्या सभेत कोणीही उभा राहून आपल्याला प्रतिप्रश्न करणार नसल्याचे खात्री असल्याने मोदी सुसाट सुटल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सरकार ३१ ऑक्टोबरलाच दुष्काळ जाहीर करण्याचा हट्ट धरून बसले आहे. त्यादिवशी राज्य सरकारचा चौथा वर्धापन दिन असल्याने दुष्काळ केल्याची जाहिरातबाजी करता यावी, यासाठीच दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असतानाही दुष्काळ जाहीर होत नसल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोलियम पदार्थांची वाढती महागाई, रूपयाची घसरती किंमत, देशाची ढासळती अर्थव्यवस्था, रोजगार निर्मितीतील अपयश, मंदावलेल्या व्यापार उदिमावरूनही त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. जलयुक्त शिवारात हजारो कोटी रूपये खर्च झाले. ते पाणी कुठे गेले, तेच दिसत नाही. मग हा पैसा नेमका कुठे खर्च झाला, याची चौकशी करण्यासाठी आयोग नेमला पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारवरही जोरदार तोफ डागली. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर पुढे निवडणूकही होणार नाही, अन् लोकशाही देखील शिल्लक राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करते आहे. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था साफ कोलमडली आहे. हमीभाव तर सोडाच पण शेतमालाचा उत्पादन खर्चही निघणे कठिण झाले आहे. घाम गाळून पिकवलेले आपल्या शेतातील पीक स्वतःच नांगरून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. अशा या सरकारविरोधात संपूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी जनसंघर्ष यात्रा सुरू झाली असून, काँग्रेस पक्ष भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आ. नसीम खान यांनी सरकारच्या जाती-जाती, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, या सरकारने आजवर भांडणे लावण्यापलिकडे काहीच केले नाही. लोकांची दिशाभूल करायची, त्यांना आपआपसात झुंजवायचे आणि सत्ता संपादन करायची, असाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. पराभव समोर दिसत असल्याने आता या सरकारने धर्मनिरपेक्ष व सरकारविरोधातील मतदारांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान रचल्याचाही आरोप त्यांनी केला.
माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस आघाडीचे सरकार आणि भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या कारभाराचा तुलनात्मक उहापोह करून मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अधिक मदत केल्याचे सांगितले. काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, नैसर्गिक संकटांमध्ये वेळोवेळी मदत केली. पण कधीही शेतकऱ्यांना अटी, निकषांच्या फेऱ्यात फसवले नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची सक्ती केली नाही, अशी अनेक उदाहरणे देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात आणि राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक आमदार बसवराज पाटील यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना काँग्रेसने आजवर मराठवाड्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. सर्वसामान्यांच्या संकटाच्या वेळी धावून येण्याची काँग्रेसची परंपरा राहिली आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते दुष्काळग्रस्त मराठवाड्याची व्यथा जाणून घेण्यासाठी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून बाहेर पडले आहेत. काँग्रेसची हीच परंपरा काँग्रेस अध्यक्ष खा. राहूल गांधी देशपातळीवर पार पाडत असून, लोकांनी त्यांचे हात बळकट करावे, असे आ. बसवराज पाटील यांनी सांगितले.
जनसंघर्ष यात्रा उद्या उदगीर येथून नांदेड जिल्ह्यात जाणार असून मुखेड व देगलूर येथे जाहीर सभा होणार आहेत.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *