Breaking News

टँकर देण्यासाठी २०१८ च्या लोकसंख्येचा आधार घ्या मराठवाड्यातील ३ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ची लोकसंख्या लक्षात न घेता 2018 ची लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून परभणी, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दुष्काळी उपाययोजनेसंदर्भात त्यांनी संवाद साधला.

सध्या आजपर्यंत परभणी जिल्ह्यात ५८ टँकर सुरू आहेत. त्यामध्ये पालम तालुक्यात सर्वाधिक १८ तर पाथरीमध्ये एकही टँकर सुरु नाही. मात्र  असे असले तरी आवश्यक आहे तेथे तातडीने टँकर्सची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करावी. जिल्ह्यातील २९ विंधन विहिरी, ३१ नळ पाणी पुरवठा योजना, ७ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, २९० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींची देयके ही पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार देण्यात येणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी २२६.४४ लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकही चारा छावण्या सुरू करण्यात आलेली नसली तरी आवश्यक आहे तेथे शासकीय चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

उस्मानाबाद जिल्ह्यात १३९ टँकर सुरू आहेत. त्यामध्ये भूम तालुक्यात सर्वाधिक  ३४ तर लोहारामध्ये सर्वात कमी १ टँकर सुरू आहे. जिल्ह्यातील ३० विंधन विहिरी, १ तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना, ७४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींची देयके ही पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार देण्यात येणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी ४३६.४१ लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८५ शासकीय चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये ५५ हजार २४७ मोठी व ६ हजार ५५८ लहान अशी ६१ हजार ८०५पशुधन दाखल आहेत. छावण्यातील मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी ९० रुपये तर लहान जनावरांसाठी ४५ रुपये अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचा विचार सुरू आहे. केंद्र शासनाच्या निकषापेक्षाही राज्य शासन अधिक निधी छावण्यांसाठी देत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु करुन पाणी पुरवठा सुरु करावा. दुष्काळी-रोहयोची कामे, तातडीने सुरु होणाऱ्या पाणी पुरवठा योजना यासाठी निवडणूक आचारसंहितेचा अडथळा नसून अधिकाऱ्यांनी विविध आवश्यक कामांना तातडीने मंजुरी द्यावी. अशा कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही.

बीड जिल्ह्यामध्ये ११ तालुक्यांपैकी आष्टी या तालुक्यात सर्वात जास्त १५७ टँकर्स सुरु असून वडवणी व परळी वैजनाथ या दोन तालुक्यात कमीत कमी ९ टँकर्स सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण ८५२ टँकर्स सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ बीड जिल्ह्यात आज अखेर ९ नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, ११ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व ९०४ विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा येाजनांची ९७.९९ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम भरण्यात आली आहेत.

आजच्या आढावा बैठकीत परभणी, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. गावासाठी जादा पाणी टँकर सुरु करणे, नव्याने टँकर सुरु करणे, विहिरींची दुरुस्ती करणे, पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करणे, तलाव दुरुस्ती, नव्याने चारा छावण्या सुरु करणे, चारा छावण्यांची संख्या वाढविणे, रोहयोची कामे सुरु करणे, रोहयो कामाचे पैसे देणे, नळ पाणी पुरवठा योजनेच्या किरकोळ दुरुस्तींना तातडीने मंजुरी देणे अशा अनेक मागण्या सरपंचांनी केल्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करुन अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

या बैठकीला मुख्य सचिव यु पी एस मदान, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंधारण व रोहयोचे सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *