राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा निवडणूकांची यादी जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने संभाव्य लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. तर काँग्रेसकडून १२ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते नवी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील काही जागांबाबत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या रस्सीखेच सुरु आहे. मात्र त्यातच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या कोट्यातील ७ जागा मागत ७ जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पेच वाढला आहे. परंतु काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत असावे अशी मत व्यक्त केले आहे.
त्यातच सांगली आणि कोल्हापूर जागेवर शिवसेना उबाठा गटाने दावा केला आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांची संख्या पुरेशी नाही असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याशिवाय भिवंडीच्या जागेवरूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहे. एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून भिवंडीच्या जागेवर त्यांच्याकडे उमेदवार असल्याचे सांगत ती जागा राष्ट्रवादीलाच द्यावी अशी मागणी केली जात आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसनेही भिवंडीच्या जागेवर दावा करत काँग्रेस कार्यकर्त्यांची एक मोठी फळी असून उमेदवार असल्याचे सांगत भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा गड असल्याचे दावा करण्यात येत आहे.
परंतु काँग्रेसकडून मतदारसंघ निहाय एक सर्व्हे करण्यात आला असून १२ पैकी १० मतदारसंघात स्थानिक मतदारांची पहिली पसंती आणि कार्यकर्त्यांची मोठी संख्या काँग्रेसचीच असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहु महाराज यांनी शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरण्यात येत आहे. परंतु तेथे शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडून शाहु महाराज यांच्या विजयाची जास्त हमी काँग्रेसला आहे. शाहु महाराज यांचा कल हा काँग्रेसकडे अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने दावा केलेल्या १२ जागांपैकी किमान १० जागी तरी विजय निश्चित आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावावर एकमत आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्याकडून आज शिक्कामोर्तब आजच होऊन संध्याकाळी लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.