Breaking News

नाना पटोले म्हणाले, निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु… गुजरातमध्ये वारेमाप दारु, पैसा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर

देशभरातील निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी समाधानकारक आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव करून विजयाची पताका फडकवली आहे. तर राजस्थान व छत्तिसगड विधानसभा पोट निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिल्ली महानगरपालिका, हिमाचल प्रदेश व गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती पण आता फक्त गुजरातमध्येच त्यांना सत्ता राखता आली. निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु झाली असून केंद्रातही परिवर्तन अटळ आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हिमाचल प्रदेश विधानसभा व पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर दादर येथील टिळक भवन या पक्ष कार्यालयात ढोल, तोशे, फटक्यांच्या आतिषबाजीसह मिठाई वाटून विजय साजरा करण्यात आला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आजचे निकाल देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे आहेत. भारतीय जनता पक्षाने ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगासह सर्व यंत्रणांचा वारेमाप गैरवापर केला. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली, मुंद्रा पोर्टावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले, तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना गुजरातमध्ये महिनाभर तळ ठोकून बसावे लागले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशातही भाजपाचा काँग्रेसने पराभव केला आहे. देशातील जनतेने काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जून खर्गेजी, सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

भारतीय जनता पक्ष व काही लोकांनी मोदी नावाचा बागुलबुवा उभा केला असून देशात कोणतीही लाट नसून लाट आहे ती जनतेची आणि देशातील जनता भाजपाचे द्वेषाचे राजकारण, ढासळती अर्थव्यवस्था, महागाई व बेरोजगारीला कंटाळली असून त्याचेच प्रतिबिंब या निकालात दिसून आले आहे. विरोधी पक्षांवर जनतेने विश्वास व्यक्त केला असून देशात आता परिवर्तन होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *