Breaking News

काँग्रेसचे झेंडे काढणाऱ्यांनो लोकांच्या मनातील झेंडे कसे काढणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा राणेंना नाव न घेता सवाल

कणकवली: प्रतिनिधी

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कणकवलीत लागलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला गेला. तुम्हाला रस्त्यावरचे झेंडे आणि बॅनर काढता येतील पण लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी खा. नारायण राणे यांचे नाव न घेता केला.

जनसंघर्ष यात्रेच्या कणकवली येथील भरगच्च सभेत खा. चव्हाण यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता काँग्रेस सोडणा-यांवर सडकून टीका केली. कणकवलीत आजही काँग्रेसच्या झेंड्याखाली मोठी सभा होऊ शकते, ही बाब लोकांच्या मनात काँग्रेस किती खोलवर रुजलेली असल्याचे द्योतक आहे. या सभेचे नियोजन करणारे कार्यकर्ते बहाद्दुर असून “ या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत.” कोकणातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आता नवे नेतृत्व घडविण्याची संधी चालत आल्याचे सांगून आगामी निवडणुकीत कार्यकर्ते सांगतील तो उमेदवार देण्याची घोषणाही त्यांनी केली.

कोकणातील दडपशाही संपवली नाही तर भविष्यात कदाचित मतदान करण्याची संधी नागरिकांना मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसने कोकणात अनेकांना मोठे काम करण्याची संधी दिली. पण त्यातील काही जणांनी पक्षाऐवजी केवळ स्वतःचाच विचार केला. अध्यक्ष एका पक्षाचे, खासदार दुस-या पक्षाचे आता निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार त्यांचे त्यांनाच ठावूक असा बोचरा सवालही त्यांनी केला.

यावेळी व्यासपीठावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम संदीप, आ. भाई जगताप,सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास सावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार पी. एन, पाटील, माजी खा. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. शेतक-यांना कर्जमाफी मिळाली नाही लोकांना चारा छावण्यांची गरज असून या परिस्थितीत सरकार डान्सबार आणि लावण्या सुरु करण्याचे काम करत आहे. मागील तीन वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम रखडले आहे. इंदू मिलच्या जागेवर नियोजीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन स्वतः पंतप्रधानांनी केले होते.  तरी आजवर ही स्मारके का उभी झाली नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली.

आपले हे अपयश दडपण्यासाठी भाजप आता काँग्रेसवर खोटेनाटे आरोप करत आहे. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात यावी हा प्रस्तावच मुळात काँग्रेसने मांडलेला असताना काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती हा भाजपचा आरोप हास्यापद असल्याची टीका करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर आरोप करण्यापूर्वी मुंबई विकास आराखड्यातील भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर द्यावे असे प्रतिआव्हानही त्यांनी दिले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी भाजप सेनेवर घणाघाती टीका केली. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मिडीयाचा प्रचंड गैरवापर केला. आज तोच सोशल मिडीया भाजपच्या डोक्यावर पाय ठेवायला लागला आहे. सोशल मिडीयातून पोलखोल होत असल्याने त्यावर विश्वास ठेवू नका असे सांगण्याची नामुष्की भाजपावर ओढावली आहे. यामुळे घाबरून जाऊन सोशल मिडीयावर निर्बंध आणले जात आहेत. देशातील एकंदर परिस्थिती पाहता अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. रामाचे नाव घेऊन या पुढे आता भाजप सेनेची युती होईल. जे मंदिर बांधायला अयोध्येत गेले ते शरयू नदीची आरती करून परत आले. पंचवीस वर्ष यांनी रामाच्या नावाखाली देशाची फसवणूक केली आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *