Breaking News

काँग्रेसचा आरोप, गांधी-नेहरु विचारधारा संपवण्यासाठी भाजपाकडून…

नरेंद्र मोदी व भाजपा लोकशाहीला संपवण्यासाठी बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर अनेकांना जेलमध्ये जावे लागले. कारण ते लोकशाही, संविधान काहीच मानत नाहीत. आता आपल्यासमोर करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर भाजपा व नरेंद्र मोदी सातत्याने टीका करत असतात त्यामागे गांधी-नेहरुंची विचारधारा संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

लोणावळ्यातील दोन दिवसाच्या राज्यस्तरीय शिबिरात समारोपाचे मार्गदर्शन करताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी फार कमी वेळ राहिला आहे. आता निवडणुका सायंटिफिक पद्धतीने लढवल्या पाहिजेत यावर चर्चा झाली आहे. बुथ मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे आहे. इंडिया आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काम केले पाहिजे आणि राज्यातून ४८ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवा. तसेच पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही. एनएसयुआय, युवक काँग्रेस, फ्रंटल सेल त्यांच्याही प्रदेश स्तरावर बैठका झाल्या पाहिजेत.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोणावळ्यात दोन दिवसाच्या शिबिरातून चांगले बौद्धीक व वैचारिक मंथन झालेले आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे. भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपाचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो, हे लक्षात घ्या असे सांगत शेवटी नाना पटोले यांनी “तुम मुझे आंधीओंका डर बताते हो, मैं तो तुफानों से बगावत कर के आया हूँ”. हा शेर ऐकवून भाषण संपवले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, काँग्रेसची पिछेहाट झालेली नाही तर तत्वज्ञानाची पिछेहाट होत आहे, शिबीरे कमी झाली म्हणून विचाराची पिछेहाट झाली आहे. आपल्याकडे परंपरा, तत्त्वज्ञान, विचार, काँग्रेस सरकारने केलेले काम आहे, काँग्रेसने देशासाठी बलिदान दिले आहे आपण काँग्रेस पक्षाचे आहोत याचा अभिमान असला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे फारसा वेळ नाही. आघाडी करून निवडणुका लढवल्या जाणार आहोत. उमेदवार कोणीही असला तरी लक्ष्य एकच आहे ते म्हणजे भाजपा व नरेंद्र मोदी सत्तेवर राहता कामा नये ते देशासाठी हिताचे नाही.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या व्यावसायिक राजकारण झाले आहेत, सत्ता आली की तिकडे जायचे, पुन्हा काँग्रेसची सत्ता आली की पुन्हा काँग्रेसमध्ये यायचे. हे चालणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. सत्तेत जायचे, पैसे कमावायचे असले धंदेवाईक राजकारण चालू देऊ नका. अशांना काँग्रेस पक्षात स्थान देऊ नका. अशा धंदेवाईक राजकारण्यांना जनतने धडा शिकवला पाहिजे. राहुल गांधी यांचे कष्ट वाया जाणार नाहीत, भारत जोडो यात्रेतून सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. आपणही जनतेकडे गेले पाहिजे, चांगले काम केले तर महाविकास आघाडी लोकसभेच्या ३८ जागांपेक्षा जास्त जिंकू शकते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, पंतप्रधान मोदी सातत्याने भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची असल्याचे सांगत असतात व स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील त्यावेळी २०४७ साली भारत विकसीत राष्ट्र होईल. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची झालेली आहे परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेची जी गती राहिली त्याच्या तुलनेत डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या काळातील गती जास्त होती, त्याच गतीने वाढ झाली असती तर भारत आजच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला असता. युपीए काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार १८३ टक्के झाला तर मोदी काळात तो १०३ टक्के झाला. अर्थव्यवस्थेची पिछेहाट होण्यामागे नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचार या पाच मुद्द्यांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली.

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०४७ साली भारत विकसित राष्ट्र होणार असे स्वप्न दाखवले जात आहे पण त्यासाठी दरडोई उत्पन वाढले पाहिजे. ज्या देशाचे दरडोई उत्पन्न जास्त ते समृद्ध राष्ट्र. त्यासाठी दरडोई उत्पन्न १३ हजार ८४५ डॉलर असावे लागते. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न २८०० डॉलर आहे. आणि त्यासाठी १० टक्के दराने अर्थव्यवस्था वाढली पाहिचे पण मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेचा दर ६.०-६.२५ टक्के आहे.म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी मोदींची अवस्था आहे, अशी टीकाही केली.

शिबिराची सांगता झाल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले, शिबिराची माहिती दिल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा असा करावा लागेल की तो कोर्टातही टिकला पाहिजे. देवेंद्र फडणविसांनी २०१८ साली असाच कायदा केला पण तो पुढे कोर्टात टिकला नाही. आता सरकार जे विधेयक आणत आहे त्यावर विधिमंडळात सर्व मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. भाजपा सरकारने मराठा समाज व जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे.आता पुन्हा फसवणूक करु नका असेही पटोले म्हणाले.

पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय राठोड, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, एनएययुआचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *