Breaking News

मुख्यमंत्री म्हणाले, कौतुकाने त्यांच्या पोटात मळमळ होते, पण अधिकाऱ्यांनी त्या… विरोधकांबरोबर प्रशासनालाही दिल्या कानपिचक्या

मराठी ई-बातम्या टीम

कोविड काळात केलेल्या कामाबद्दल माझा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून कौतुक करतात. पण काही जणांना आपले कौतुक परवडत नाही आणि पोटात मळमळ होते अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर करत एखादं पद, अधिकार लाभला की मी बरा, माझे कार्यालये बरे असं न समजता मिळालेल्या अधिकाराचा, पदाचा समाजासाठी वापर करणे गरजेचे असल्याची टोचणी त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिली.

शस्त्रक्रियेनंतर एक एक पाऊल टाकत मी जाहीर कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत आहे. कार्यक्रमाला प्रत्यक्ष येण्याची माझी इच्छा असते, असे सांगत ते म्हणाले की, आजचं माझं या कार्यक्रमात वर्णन केले गेले त्यावरुन नाही म्हटलं तरी माझ्यावर दबाव आलेला आहे. सलमान खानच्या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने थप्पड से डर नही लगता असे म्हटले आहे. आम्हा राजकारणातल्या लोकांचे नेहमी थप्पड देणे आणि खाणे हे आमचे आयुष्य आहे. त्यात कौतुक केलं की थोडी धडधड होते. मला कल्पना आहे की ते कौतुक आणि माझ्या घरच्यांनी कौतुक करणे वेगळे आहे.

जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन वास्तुच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री आदिती तटकरे, धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे आदी उपस्थित होते.

आपल्या कुटुंबातील महत्त्वाचा घटक हा सर्वसामान्य माणूस आहे आणि सुखाचे आयुष्य कसे जगेल हे पाहणे माझ्यापासून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या अशा इमारती आतापर्यंत जिथे हव्या आहेत तिथे होण्यास काहीच हरकत नव्हती. तुम्हाला सुविधा नसतील तर तुम्ही कामे कशी करणार? एकमेकांकडून अपेक्षा करुन जनतेची कामे सुरळीतपणे व्हावीत हा त्यामागचा उद्देश आहे. धर्मादाय संस्थामध्ये काही लोक चांगल्या हेतूने काम करतात. माझी अडचण सगळ्यांना माहिती आहे. आज मला उपस्थित राहता आले नाही याचा अर्थ माझा तुमच्याकडे लक्ष नाही असा होत नाही. तुम्ही वेळोवेळी गोष्टी सांगितल्या तर हक्काने तुम्हाला मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.

कोविड काळात केलेल्या कामाबद्दल माझा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून केला जातो. काही जणांना आपले कौतुक परवडत नाही आणि पोटात मळमळ होते. मग भ्रष्टाचार खणून काढण्याचे बोलले जाते. काय काढायचे ते काढा पण आपण जास्तीत जास्त सेवा देऊ शकलो त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. ज्यांचे प्राण वाचले त्यांची संख्या ही आरोप करणाऱ्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. म्हणून आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नाही. आरोप करणाऱ्यांनाचा सरकारी आरोग्य केंद्रात अगदी फुटक तपासणी करुन देऊ. विरोधक आहेत म्हणून त्यांचा इलाज करायचा नाही अशातला भाग नाही असा टोलाहा त्यांनी विरोधकांना लगावला.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *