Breaking News

मुख्यमंत्री खोटारडे…म्हणे महाराष्ट्र हागणदारी मुक्त फडणवीस म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

नांदेड : प्रतिनिधी

राज्य हागणदारीमुक्त झाले आहे, असा नविन दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, ग्रामीण भागात जाऊन त्यांनी स्वतः परिस्थिती पाहावी, फडणवीस म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा सणसणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारविरुद्ध आता आणखी आवाज तीव्र करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

भीमा-कोरेगावचे प्रकरण असो, किंवा राज्यातील इतर घटना असो, जाती-जातीत संघर्ष निर्माण करून बघ्याची भूमिका घेण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असेच काम करत असून, आज महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा नविन दावा त्यांनी केला आहे. हा दावा हास्यास्पद असल्याचे सांगून २०१२ लोकसंख्येच्या एकंदर घरकुलांच्या संख्येवर ते दावा करत असून, या सहा वर्षात वाढलेल्या घरांची संख्या, कुटुंबाची संख्या लक्षात घेता आजही किमान ४० ते ४५ हजार कुटुंबे प्रत्येक जिल्ह्यात शौचालयाविना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोट्या व फसव्या घोषणा करून फडणवीस सरकार जनतेला उल्लू बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यस्तरावरील जागा वाटपाची बोलणी पूर्ण झाली असून, इतर समविचारी पक्षांना जसे भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यासारख्या पक्षांना आम्ही सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने सर्वसामान्य जनतेची फसवणूकच केली असून, अच्छे दिनचा वादा आता स्वप्नातच पहावा लागेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले. देशात व राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून, जम्मू कश्मीर, उत्तर प्रदेश याठिकाणी महिला व अल्पवयीन मुलींवर झालेले अत्याचार या घटना म्हणजे देशाला काळीमा फासणाऱ्या घटना असल्याचे सांगून यावर ना पंतप्रधान बोलतात, ना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, ना जम्मू कश्मिरच्या मुख्यमंत्री. उलट त्या त्या राज्यातले विविध मंत्री याबाबत चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असून, या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.

येणाऱ्या २०१९ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभाग स्तरावर आजचे हे शिबीर आयोजित करण्यात आले असून, मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना यावेळी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *