Breaking News

कायदे धाब्यावर बसवून नितीन गडकरी व भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर

भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊ नितीन गडकरी व भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की, निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भारतीय जनता पक्ष व उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला आहे. दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत शाळकरी मुलांना सहभागी केले होते. हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या प्राचार्यांनाही निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे. निवडणुक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असेही लोंढे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका” परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र गडकरी यांना नागपुरच्या गल्लीबोळात फिरावे लागत आहेत, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *