Breaking News

आशिष शेलार यांची खोचक सवाल, उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का? उद्धव ठाकरे यांच्या परदेश वारीवरून केली टीका

पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे यावेळी नमूद करत उध्दव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा खोचक सवाल अॅड आशिष शेलार यांनी केला.

मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवसापासून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. प्रथम आशिष शेलार यांनी गजधरबांध परिसरातील नाल्याची पाहणी केली. तर काल पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा या नाल्यांची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड (पश्चिम ), अवधूत नगर नाला दहिसर (पूर्व ) एन.एल कॉम्प्लेक्स जवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी करतोय. जी आकडेवारी पालिका सांगतेय आणि प्रत्यक्ष चित्र यामध्ये तफावत आहे. ९५ % सफाईचा दावा वडनई नाल्याचा केला जातोय, पण प्रत्यक्षात अद्याप गाळ नाल्यातून काढण्यात येतो आहे.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली त्याचे स्वागत आहे, शिंदे हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईकरांची काळजी केली. यापुर्वी उध्दव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिला. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत होते असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उध्दव ठाकरे कुठे आहेत? इथे नाल्यावर मर्दूमकी का दाखवत नाहीत, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का? असा खोचक सवालही केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे स्थानिक आमदार, नगरसेवक, उत्तर मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा पदाधिकारी आणि पालिका अधिकारी सहभागी झाले होते.

Check Also

अजित पवार यांचे आदेश, सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे वेळेत गतीने मार्गी लावा राज्यातील विकासप्रकल्पांचा सविस्तर आढावा

राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्या दृष्ट‍िने महत्वाच्या असणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *