Breaking News

भाजपचेच आमदार सांगतात बोंडअळी-तुडतुड्याचा मुद्दा लावून धरा अजित पवारांचा विधानसभेत गौप्यस्फोट

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील विशेषत: मराठवाड्यात आणि विदर्भातील शेतींवर बोंडअळी व तुटतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडा अशी मागणी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या अनेक आमदारांनी आपल्याकडे वैयक्तीकपणे केली असून त्यावेळी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे हे ही उपस्थित होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केला.

विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती, अनुशेष राखीव, शेतीशी निगडीत असलेल्या अनेक विविध प्रश्नांवर २९३ अन्वये चर्चेचा प्रस्ताव भाजपचे डॉ.अनिल बोंडे यांनी मांडला. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका मांडताना अजित पवार यांनी वरील गौप्यस्फोट केला.

काही दिवसांपूर्वी विदर्भातील एके जिल्ह्यात मी विमानतळावर असताना भाजपचे अनेक आमदार डॉ.बोंडे यांच्यासह काही आमदार आलेले होते. त्यावेळी माझ्या पक्षाचा मी आणि आणखी एकजण होतो. बाकी तुम्हीच सगळे होतात. त्या आमदारांनीच हे मुद्दे सांगितल्याचे मला सांगितले की नाही ते सांगा असे पवार यांनी डॉ.बोंडे यांना विचारले.

त्यावर डॉ.बोंडे यांनी याशिवाय तुम्हाला मोर्शीला भेट देण्याबाबतही विनंती केल्याचे ते ही तुम्ही सांगा असे अजित पवार यांना सांगितले. यावेळी विधासभेत एकच हशा उसळला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच भाजपचेच नागपूरचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे असूनही देशात नागपूर गुन्ह्यांमध्ये दोन नंबरवर असल्याचे वास्तव पत्र लिहून मांडले आहे. त्याचबरोबर इतर प्रकरणातही राज्य सरकार अपयशी ठरल्याचे सांगत आपली नाराजी पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षांवर तेवढा विश्वास असल्यानेच डॉ.बोंडे यांनी तुम्हाला सांगितल्याची टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.

त्यावर भाजपचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा देवून काय चुक केलीय ते दाखवून दिलेय. त्यामुळे आणखी काही दिवस थांबा तुमच्या पक्षात संघाच्या मुशीत तयार झालेलेच राहणार असून बाकीचे सर्व पुन्हा आपल्या मुळ घरी अर्थात मुळ पक्षात परतणार असल्याचे सांगत नजकीच्या काळात राजकिय भूकंप होणार असल्याचे सूचित केले.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *