Breaking News

भगतसिंग कोश्यारींचा दावा, त्या १२ आमदार नियुक्तीच्या पत्रातून उध्दव ठाकरेंनी दिली होती धमकी अन्यथा त्याचवेळी महाविकास आघाडीचे आमदार नियुक्त झाले असते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील पत्र युध्द चांगलेच रंगले होते. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवरूनही अनेक वेळा प्रश्न निर्माण झाले. मात्र त्यावेळी १२ आमदार नियुक्तीच्या मुद्यावरून त्यावेळी चकार शब्दाने न बोललेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त झाल्यानंतर त्या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या पत्रात उध्दव ठाकरे यांनी धमकी दिल्याचा दावा केला. त्यामुळे आपण त्या पत्रावर सही केली नसल्याचे सांगितले.

पदमुक्त झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड येथील आपल्या निवासस्थानी परतले. त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीबाबत एका खाजगी वृत्तवाहीनीने मुलाखत घेतली. त्यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी वरील दावा केला.

यावेळी भगतसिंग कोश्यारी यांना १२ आमदारांची नियुक्ती तुम्ही का केली नाहीत? असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, कुणालाही सांगितलं नाही ते तुम्हाला सांगतो. मी पदावरून जाईपर्यंत त्या पत्रावर सही केली नाही. कारण त्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी मला पत्रातून धमकीच दिली होती. १२ आमदारांची नियुक्ती पंधरा दिवसांच्या आत किंवा त्याच्याही आधी करा अशी धमकीच देण्यात आली होती. राज्यपाल हा काही राज्याचा रबरस्टँप नसतो. पाच ओळींचं पत्र लिहिलं असतं तरीही मी त्यांची मागणी मान्य केली असती. मला पत्रातून धमकी देण्यात आल्याने मी १२ आमदारांची नियुक्ती केली नाही असे सांगितले.

त्याचबरोबर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंग कोश्यारी यांना विचारलं असता ते म्हणाले, सारखं सारखं हे सांगितलं जातं की पहाटेचा शपथविधी, रातोरात सगळं ठरलं ते म्हणणं चुकीचं आहे. कारण तो सकाळचा शपथविधी होता. जर अजित पवार माझ्याकडे आमदारांच्या सह्या असलेलं पत्र घेऊन येतात आणि हे सांगतात की आम्हाला सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे तर मग मी काय करायला हवं होतं? देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार हे देखील सांगितलं. सकाळीच शपथविधी करायचा हे अजित पवारांनी सांगितलं. मी हो म्हटलं. त्यात काय चुकीचं आहे? असा प्रतिप्रश्नही केला.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनीही ही सांगितलं होतं की आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे. मी त्यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांची मुदत कमी केली तेव्हा त्यांचं सरकार पडलं असंही भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते मंत्रालयात कधी आले होते? महाविकास आघाडीच्या काळात सकाळी ८ वाजल्यापासून काम करणारी व्यक्ती एकच होती ती व्यक्ती म्हणजे अजित पवार असंही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो की त्यांनी मला महाराष्ट्राचं राज्यपालपद दिलं होतं. तसंच महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप प्रेम दिलं. जे काम मी करतो ते जनहितासाठी करतो. वाद-विवाद काही बोललो नसतो तरीही झालेच असते. मी कुठल्याही वादावर प्रतिवाद केला नाही. माझ्या सीमा मला माहित आहेत. मी माफी मागण्यासाठी कधीही मागेपुढे पाहिलं नाही अशी सारवासारवही त्यांनी केली.

Check Also

अंबादास दानवे यांचा आरोप, नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर

राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक २०२४ चे कामकाज सुरु झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *