Breaking News

केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ?

सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच प्रसारमाध्यमांसमोर केला त्यावर बोलताना महेश तपासे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी बोलताना महेश तपासे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना परमेश्वर दीर्घायुष्य देवो, परंतु ज्यापद्धतीने दीपक केसरकर यांनी बंडाबाबत काही गोष्टींचा खुलासा केला व बंड अयशस्वी झाल्यास काय झाले असते असे सांगितले त्यातून स्वाभाविकच काही प्रश्न निर्माण होतात. एकेकाळी अमर्यादित असे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते. ते ठरवतील ती पूर्व दिशा, एवढा मान उध्दव ठाकरे कुटुंबाने दिला होता याची आठवणही करून दिली.

तसेच भाजपा युतीवरून मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात येत असलेल्या वागणूकीवरून टीका करताना महेश तपासे म्हणाले, मात्र आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसून देखील भाजपाच्या इशाऱ्यावर चालावे लागते आहे ही शोकांतिका आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती जागा शिंदे गटाला मिळतील याबाबत एकनाथ शिंदेंच्या आमदारांना व खासदारांनाच खात्री नाही. तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पूर्णपणे असहकार्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी ठळक जाहिरात वर्तमानपत्रात करुन भाजपाला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या दिवशीच जाहिरातीचा मजकूर बदलवून घ्यावा लागला इतका दबाव भाजपाने मुख्यमंत्र्यांवर आणल्याचे चित्र होते.

मंत्रिमंडळाचा विस्तार असो की इतर कुठल्याही महत्वपूर्ण बाबींचे निर्णय असो तेथे केंद्रातील भाजपाच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घेता येऊ शकत नाही हे सध्या महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

बंडाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मनावर नक्कीच दडपण असू शकेल. परंतु त्यापेक्षा मोठा दबाव आज भाजपाचा आहे हे कोणी नाकारू शकत नाही असेही महेश तपासे म्हणाले.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *