Breaking News

ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले जखमींची रूग्णालयात जाऊन केली विचारपूस

ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचे प्राण गेले असून ९०० हून अधिक जण जखमी आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली.

शुक्रवारी सायंकाळी ही घटना उजेडात आली तेव्हा ५० जणांचा मृत्यू झाला होता. परंतु बचावकार्य सुरू करताच मृतांची संख्या वाढत गेली. तसंच,जखमी प्रवाशांची संख्याही वाढली. आज ३ जून रोजी या अपघातातील मृत आणि जखमींची अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर अवघ्या देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तीन रुळांवरून धावणाऱ्या तीन रेल्वे एकाचवेळी एकमेकांना धडकल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती घेण्याकरता पंतप्रधान घटनास्थळी दाखल झाले.

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत घडलेल्या घडामोडीची माहिती. तसंच, मोदींनी उपस्थित बचावकार्य पथकातील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्र्यांसोबतही त्यांनी चर्चा केली. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शोकग्रस्त कुटुंबांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही आणि पीडितांना आवश्यक ती मदत मिळत राहावी यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

घटनास्थळावर सर्व पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींना भेटण्यासाठी थेट रुग्णालयात गेले. तेथे त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. त्यांनी प्रत्यक्षात जखमींसोबत संवाद साधला असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे.

अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. ओडिशा सरकारचे, प्रशासन अधिकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांच्याकडे जे संसाधन होते त्यातून त्यांनी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या काळात येथील नागरिकांनी रक्तदान शिबिर, बचावकार्यात मदत केली. या क्षेत्रातील तरुणांनी रात्रभर मेहनत केली. या क्षेत्रातील नागरिकांचे आदरपूर्वक नमन करतो. त्यांच्यामुळेच बचावकार्य तेजीने होऊ शकलं. बचावकार्य आणि वाहतूक पूर्ववत करण्याकरता सुविचारी प्रयत्न करण्यात येत आहेत. या दुःखद प्रसंगात मी घटनास्थळी जाऊन आलो आहे. रुग्णालयातील जखमींसोबत मी संवाद साधला आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. पण आपण लवकरात लवकर या दुःखातून बाहेर पडू, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भारतीय रेल्वेचे ७० टक्के खासगीकरण

भारतीय जनता पक्षाला माझे आव्हान आहे की, मी जी माहिती देत आहे ती खोटी आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *