Breaking News

केंद्राच्या निधीतून राज्यात ४ लाख कोटींची कामे पूर्ण केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरींची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असून रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात ५ लाख कोटींची कामे करण्याचे टार्गेट ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची कामे आपण करू शकू, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

राज्यात बंधारे कम पूलाची १६७ कामे करण्याचा मानस असून त्यातून दुष्काळग्रस्त  भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने गडकरी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची जास्तीत कामे या वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार  केला आहे. त्यासाठी २ लाख ८२ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. कल्याण-माळसे मार्गासाठी निधी वितरित केला असून हा मार्ग थेट विशाखापट्टनम पर्यंत नेण्यात येणार आहे.  महामार्गावरील पूल बांधत असताना ते बॅरेज पूल असतील. १६७ अशा पूलांची कामे मंजूर करण्यात आली असून त्यातील दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील ९९ तर विदर्भातील ५५ पूलांचा समावेश आहे.  यातून ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली येईल. शिवाय जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे आजूबाजूच्या विहीरी आणि बोरवेलच्या माध्यमातूनही जमिन ओलीताखाली येईल अशी आशा व्यक्त करत ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय प्रश्नांना गडकरी यांनी सफाईदारपणे बगल देत  दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज कमी पडतो का असे विचारले असता, तसे म्हणता येणार नाही, असे सांगून गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात चढ-उतार येत असतात. त्यामुळे आपली दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची संधी हुकली असल्याची खंत नाही, मात्र त्यावेळी खोटे आरोप झाले याचे शल्य नक्कीच असल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

मुंबई-गोवा मार्ग २०१९ पर्यंत पूर्ण करणार

मुंबई – गोवा महामार्गामधील बहुतेक अडथळे दूर झाले आहेत. मुख्यअडथळा जमिन संपादनाचा होता तोही दूर झाला आहे. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत मुंबई गोवा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. मुंबई – गोवा जलवाहतुसाठीही आपण प्रयत्नशील असून त्यासाठी परदेशी कंपनीला त्याचा आराखडाही तयार करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई-अलिबाग रोरो सेवाही लवकरच सुरू होईल  असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

बीपीटीच्या जमिनीवर भव्य उद्यान

मुंबईतील वाढत्या प्रदुषणाबद्दल खंत व्यक्त करून गडकरी म्हणाले की, मिठी नदी अद्याप सुद्ध होऊ शकली नाही, याची आपल्याला खंत वाटते. मुंबईतील प्रदुषित सांडपाण्यामुळे समुद्र प्रदुषित होत आहे. हे थांबले पाहिजे. सांडपाणी प्रक्रिया करूनच समुद्रात सोडले गेले पाहिजे. मुंबईकरांना शुद्ध हवा मिळत नाही. त्यासाठी बीपीटीच्या साडेआठशे एकर जागेवर भव्य उद्यान उभारण्याचा आपला मानस असल्याचेही गडकरी म्हणाले.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *