Breaking News

राज ठाकरे स्पष्टच म्हणाले, अजित पवार गेले ते शरद पवार यांच्या संमतीनेच…. महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊन धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही

आगामी लोकसभा निवडणूकांना आता काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणे अपेक्षित होते. परंतु या निवडणूका काही होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यातच भाजपाकडून काहीही करून लोकसभा निवडणूका जिंकायच्याच हा हेतू उराशी बाळगून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट आणि मुळ भाजपा असे सुत्र बांधत महायुती जाहिर केली आहे. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला पराभूत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या जवळकीच्या वर्तुळात असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोणत्या गटाशी युती करणार याबाबतची उत्सुकता लागून राहिलेली असताना याप्रश्नावर राज ठाकरे यांनी स्वतःचं यावर भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे म्हणाले, आत्ताची ही बैठक पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व महानगर पालिका निवडणुकांसाठी होती. यावर्षी महानगर पालिका निवडणूका लागतील असं वातावरण मला दिसत नाही. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घोळात आता कुणी महानगर पालिकेच्या निवडणुका लावतील आणि पायांवर धोंडा पाडून घेतील असं मला वाटत नाही. पण आता ज्या निवडणुका लागतील, त्या लोकसभेच्याच लागतील असं वाटतंय. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी होईल. प्रत्येक मतदारसंघात आमच्या टीम जातील. त्यानुसार त्यांना निर्देश दिले आहेत. परवा त्यांच्याकडे संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल. त्यानुसार ते आपापल्या मतदारसंघात कामाला रुजू होतील.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

राज्यात सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये घडणाऱ्या घडामोडी बघता काय वाटतं? अशी विचारणा केली असता राज ठाकरेंनी त्यावर मिश्किल टिप्पणी करताना म्हणाले, मी कुणाला बघत नाही. मी मलाच बघतो. आमचं-आमचं काम चालूच राहील, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी काही पत्रकारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची नेमकी काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी सूचक विधान करताना म्हणाले, परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तर तुम्हाला सगळ्यांना सवयही झालीये त्याची. पण महाराष्ट्राची प्रतारणा आपल्याकडून होणार नाही, याची जास्तीत जास्त काळजी आमच्याकडून घेतली जाईल, असंही सांगितले.

या पुढे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारायला सुरुवात केली असता त्यांचं नाव ऐकताच राज ठाकरेंनी “ए गप रे”, असं म्हणत तो प्रश्न उडवून लावला व तिथून ते निघून गेले.

दरम्यान, तसेच यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, मी यापूर्वीच बोललो होतो. अजित पवार गेले तर शरद पवार यांच्या सहमतीनेच गेले. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांना चोरून भेटायची काय गरज आहे बरं ते भेटले कोठे तर “चोरडिया” यांच्या घरी, काय यांनाही घर भेटले असा उपरोधिक टोला लगावला.

तसेच सध्या भाजपासोबत अजित पवार यांचे काय करणार असा प्रश्न भाजपाला विचारला असून त्यांनी अद्याप त्याचे उत्तर दिलेले नसल्याने भाजपाच्या ऑफरबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Check Also

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *