Breaking News

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही

सध्या देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. देशाच्या राज्यघटनेवर होत असलेला हल्ला परतवून लावण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहोत. प्रकाश आंबेडकर आणि माझे आजोबा यांच्यातील वैचारिक ऋणानुबंधाच्या नात्यामुळे आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली होती. परंतु आज प्रकाश आंबेडकर काहीही बोलत असले तरी मी त्यांच्या वक्तव्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही अशा स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मातोश्री येथे भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही एका वेगळ्या नात्यातून आघाडी केली होती. आज प्रकाश आंबेडकर यांनी काहीही भूमिका जाहिर केलेली असली तरी मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि मी स्वतः काहीही बोलायचं नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. परंतु आमचं आजही म्हणणं आहे की, प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर जरी आज आमचं काही जमलं नाही तरी भविष्यकाळातही तुम्ही आमच्यासोबत असावं आणि त्याच भूमिकेतून प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली होती असेही सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, देशात आज जे काही सुरु आहे ते राज्यघटनेवर हल्ला करून सुरु आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी आम्ही आघाडी केलेली आहे. जर देशाची राज्यघटना जर वाचली तर सर्वांचे अधिकार वाचतील. याबाबत स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच राज्यघटनेत सांगितले आहे. राज्यघटनेने हे अधिकार आता धोक्यात आल्याने आणि देशात हुकूमशाही लागू करण्याच्या मार्गाकडे काहीजणांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सोबत रहावे अशी इच्छा आहे. देशात आजही लोकशाही असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काय बोलावे आणि काय मत व्यक्त करावे काय नाही याबाबत अधिकार आज आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या मतांवर मी काहीही बोलणार नाही असे स्पष्टोक्तीही यावेळी दिली.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *