Breaking News

अपात्रतेच्या मुद्दाप्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या सुनावणीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र या प्रकरणी आमदारांना दोन आठवड्यांचा अवधी वाढवून मिळाला आहे. या मुदतवाढीसाठी न मिळालेल्या कागदपत्रांबरोबरच गणेशोत्सवाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांना गणपती पावला असे म्हटले जात आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू झाली. शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील यावेळी युक्तिवाद करत होते. दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले गेले. शिंदे गटाकडून अनिल सिंग, तर ठाकरे गटाकडून वकील असीम सरोदे हे बाजू मांडत होते. यावेळी दोन्ही गटानी आपलाच पक्ष कायदेशीर असल्याचे विधानसभा अध्यक्षांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

सुनावणीनंतर शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, आम्हाला सुनील प्रभू यांच्याकडील कागदपत्रे मिळाली नाहीत. तसेच आमच्याकडील कागदपत्रही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला दोन आठवड्याची मुदत द्यावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. गणपती उत्सव असल्याने अनेक आमदार गावाकडे जात असतात. त्यामुळे दोन आठवड्यांची मुदत असावी अशी मागणीही आम्ही विधानसभा अध्यक्षांना केली होती, असे अनिल सिंग यांनी सांगितले.

शिंदे गटाची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला दोन आठवड्याचा वेळ दिला आहे. आजपासून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. तसेच दोन आठवड्यात फाईल एक्सचेंज करण्यासही सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढची तारीख मिळणार आहे. त्यानंतर केस कशी चालेल याचा कार्यक्रम ठरेल. नंतर निमित सुनावणी सुरू राहील, असे अनिल सिंग यांनी सांगितले.

आज फक्त एकनाथ शिंदे यांच्या एकाच याचिकेवर सुनावणी झाली. शिंदे हेच प्रतिवादी होते, अशी माहितीही अनिल सिंग यांनी दिली.

निवडणूक आयोगाचा निकाल ही शिंदे गटाची रणनीती

एकनाथ शिंदे गटाकडून दोन वकील विधानसभा अध्यक्षांसमोर भूमिका मांडणार होते. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणारे प्रसिद्ध विधिज्ञ हरीश साळवे यांच्या टीमतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता. निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होऊ शकत नाहीत, अशी भूमिका मांडण्याची रणनीती शिंदे गटाने केली होती.

Check Also

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *