Breaking News

दीपक केसरकर यांचा सवाल,…उद्धव ठाकरे हे राहुल गांधींकडून माफी वदवून घेणार का? किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार? शिदे गटाचा उबाठा गटावर घणाघात…

ही मुंबई हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि दुर्दैवाने याच शहरात त्यांचा मुलगा बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का ? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना करत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जमलेले किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार ? असा परखड सवाल उबाठा गटाला विचारत कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, लालुप्रसाद यादव, समाजवादी पक्ष, काँग्रेस या भ्रष्ट नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. हा बाळासाहेबांच्या विचारांविरोधात दगा आहे, अशी परखड टीका केली.

I.N.D.I.A आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते व मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली व त्यांनी विविध मुद्द्यांचा समाचार घेतला.
INDIA आघाडीच्या नेत्यांनी बैठकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना खा. गजानन किर्तीकर यांनी हे सर्व पक्ष घराणेशाहीचा परिपाक असल्याचा आरोप केला. या आघाडीत सामील झालेल्या पक्षांपैकी १७ पक्ष हे घराणेशाही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना देशाच्या विकासाची काहीच पडलेली नाही, अशी टीकाही केली.

उद्धव काँग्रेसच्या ताटखालचं मांजर…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेला विरोध केला. एक वेळ पक्ष विसर्जित करेन, पण शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळासाहेबांनी आयुष्यभर घेतली. उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर बनले आहेत, असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी मिठी मारून करावं, हे दुर्दैवी आहे, असं खा. किर्तीकर म्हणाले.

कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या समाजवादी पक्षासोबत, राम मंदिरासाठी निघालेली रथयात्रा अडवून अडवाणींना अटक करणाऱ्या लालुप्रसाद यादवांसोबत आणि उद्दाम व्यक्तिमत्त्वाच्या राहुल गांधींसोबत उद्धव यांनी बसावं हे वाईट आहे, अशी टीका खा. किर्तीकर यांनी केली.

… तर उद्धव यांनी युती तोडली असती का ?

उद्धव ठाकरे यांनी केवळ स्वत:ला मुख्यमंत्रीपद मिळावं, म्हणून या सर्व कोलांट्याउड्या मारल्या. भाजपने त्यांना पाच वर्षं मुख्यमंत्रीपद देऊ केलं असतं, तर त्यांनी युती तोडली असती का, या प्रश्नाचं उत्तर उद्धव यांनी द्यावं. निवडणुकीनंतर उद्धव मोदींना भेटले होते. आपल्या युतीचा विजय झाल्याने आपलीच सत्ता येईल, एवढी बोलणी झाली होती. पण नंतर मुख्यमंत्रीपदामुळे त्यांची मति फिरली, असा घणाघात आ. केसरकर यांनी केला.

तसंच २०१४ मध्ये न मागता शरद पवार यांनी भाजपला स्थिर सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता. आताही पवार साहेबांनी स्थिर सरकारासाठी आमच्यासोबतच यावं, असं केसरकर म्हणाले.

उद्धव यांना आव्हान…

मुंबईत सत्तेच्या मिषाने एकत्र आलेल्या या पक्षांपैकी अनेकांनी बाळासाहेबांचा सतत विरोधच केला. उद्धवना या सर्वांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी या सर्वांना घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकावर जावं. तिथे जाऊन या सर्वांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करायला लावावं, असं खुलं आव्हान शिवसेना पक्षातर्फे दीपक केसरकर यांनी उद्धव यांना दिलं.

नव्या बाटलीत जुनी दारू

काँग्रेसने UPA च्या काळात अमाप भ्रष्टाचार केला. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर त्यांचा हा भ्रष्टाचार उघडा पडला. त्यामुळे UPA हे नाव घेऊन लोकांसमोर गेलो तर लोक नाकारतील, ही भीती काँग्रेसला वाटते. त्यामुळे त्यांनी INDIA हे देशाचं पवित्र नाव धारण करत ही भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधली आहे. पण नाव बदललं, तरी आतली माणसं तीच आहेत. हे म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू भरण्यासारखं आहे, अशी टीका केसरकर यांनी केली.

जनतेने तुम्हाला नाकारलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू झाली आणि त्यात तुमच्यापैकी काहींची चौकशी झाली, तर ती लोकशाहीविरोधी कारवाई नसते. देशात लोकशाही नसती, तर इतर राज्यांमध्ये तुमची सरकारं कशी आली असती, असा सवालही दीपक केसरकर यांनी या वेळी I.N.D.I.A आघाडीला विचारला.

देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. सामान्य माणूस सुखी होत आहे आणि तुम्हाला आता लोकशाहीचा पुळका आला आहे. पण देशाने, देशातल्या लोकांनी तुमच्या भ्रष्ट आघाडीला नाकारलं आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही केसरकर यांनी दिला.

मोदीच सक्षम नेतृत्व…

हे विरोधक सत्तेत आल्यावर चीनला अरुणाचल प्रदेशातून मागे ढकलण्याची भाषा करतात. पण ते त्यांना शक्य नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याएवढं सक्षम नेतृत्व या लोकांकडे नाही. मोदींच्या काळात देशाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. पूर्वी आपल्या देशात शस्त्रास्त्र तयार होत नव्हती. आता आपण त्या आघाडीवरही सक्षम झालो आहोत. आज जगभरातील देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळेच या विरोधकांना रोजगाराचा मुद्दा आता आठवला, असंही केसरकर म्हणाले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विनोद घोसाळकर यांचे प्रतिपादन, अभिषेकला विश्वासघाताने संपवले…

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *