Breaking News

सुप्रिया सुळे यांचा आरोप, मुंबईचा अधिकार हिरावण्याचा केंद्राचा प्रयत्न हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून आंदोलन

मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगावर सोपविली आहे. हे राज्यातील मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. केंद्र सरकार जे सांगते त्या पावलावरती पाऊल इथलं सरकार टाकत आहे. नीति आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पंतप्रधान कार्यालयाच्या मार्फत मुंबई चालवणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महाराष्ट्राच्या करिता बलिदान देणाऱ्या हुतात्मा यांना अभिवादन करत हुतात्मा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे त्यापुढे म्हणाल्या की, नीति आयोगाच्या मार्फत मुंबईचा विकास हातात घेतला तर मुंबई पालिका आणि मुंबईतल्या आमदार खासदारांना काय अर्थ राहणार नाही. म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान कार्यालय मुंबई चालवणार का? असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. मुळात राज्य सरकारसमोर नीति आयागाने मुंबईच्या विकासाबाबत जे सादरीकरण केले ते एका खासगी कंपनीने तयार करून दिले होते. मला असे कळले आहे की या खासगी कंपनीने ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या एमएमआरडीएकडूनच मिळवली. म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडूनच माहिती मिळवून ती पुन्हा महाराष्ट्र सरकारपुढेच सादर करण्यात आली. सरकारमधील कोणत्याच नेत्याला हे कसे कळले नाही. तसेच निती आयोग जो काही विकासाचा आराखडा राबवनार त्याची गॅरंटी कोण घेणार? असा सवालही केला.

हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले की, मुंबईच्या विकास आराखड्याचे काम केंद्राच्या नीति आयोगाकडे सोपवणे म्हणजे महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी आम्ही पडेल ती किंमत देऊ. हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आधीच्या काळामध्ये नियोजन आयोग होता. आता त्याच रूपांतर नीति आयोगात करण्यात आलेल आहे. पण हे आयोग फक्त मार्गदर्शनाचं काम करतात केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी पहिली स्टेप ही अशा पद्धतीने केली जाते असे आम्हाला वाटतं, कारण अशा पद्धतीने आर्थिक नाड्या अडकवायचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईकर सावध आहे. देशातील सध्या चालू असलेल्या घाणेरड्या राजकारणाला साथ देण्याचा निर्णय जर राज्य सरकार घेणार असेल तर त्यांना वेळीच रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईकर जनतेच्या मागे उभी राहील असेही म्हटले आहे.

हिमालायसमोर सह्याद्री कधीच झुकली नाही

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, हळुहळू महाराष्ट्राचे हृदय हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. एक प्रगतीशील, सर्वात वैविध्यपूर्ण, मुंबई हे असे शहर आहे जिथे जात, पात, वर्ग, धर्म याची पर्वा न करता सर्वजण एकत्र राहतात. मात्र, ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत मुंबई महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. महाराष्ट्रापासून ती सुटू देणार नाही.

हिमालायासमोर सह्याद्री कधीच झुकली नाही. सह्याद्री हा हिमालयाच्या मदतीला जातो. हे आश्चर्यकारक आहे की मुंबईकरांना नाही तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला जाग आली आहे. हा वेगळा विषारी डाव केंद्रातील सत्ता टाकते आणि महाराष्ट्र सरकार ही केंद्राच्या निर्णयाला नतमस्तक होतय. हे आम्हाला चालणार नाही. मुंबई कुठल्याही परिस्थितीत माझ्यासारख्याचा जीव केला तरी बेहत्तर. पण आम्हाला हुताम्यांनी दिलेली आमची मुंबई आम्ही सुरक्षित ठेवू आणि महाराष्ट्र मुंबईला बिलगुन बसला आहे. आमच्या मिठीतून मुंबई आम्ही बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा दिला.

जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय नीति आयोग महाराष्ट्राच्या आराखडा तयार करण्याच्या निर्णावर टीका केली. मुंबई ही एका संघ राज्याची राजधानी आहे. हे संघ राज्य आहे, केंद्रीय राज्य नाही. महाराष्ट्राच्या अधिकारावर अतिक्रमण करून तुम्ही नीति आयोगाला त्याचावरी बसवणे. हे मुंबई तोडण्याचे काम करत आहात. आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. मुंबई मराठी माणसाचे हृदय आहे. त्याच्या हृदयावर तुम्ही काल हातोडा मारलात. मला आश्चर्य वाटते की, आपले पूर्ण मंत्रिमंडळ तेथे उपस्थितीत होते आणि त्यांच्यासमोर हा निर्णय झाला की मुंबईचा आराखडा निती आयोग तयार करणार. आपला एकही माणूस बोलला नाही असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहीत पवार, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले.

Check Also

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *