श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये एकाचवेळी सर्वाधिक १७ वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने दखल घेतली असून याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी वितरित केले आहे याबद्दल अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पेनेतून सुरु झालेल्या ‘ श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाची नुकतीच सांगता झाली. २६ जानेवारी २०२४ पासून मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी पारंपरिक देशी खेळांची स्पर्धा आयोजित केली गेली होती.
मल्लखांब, मल्लयुद्ध,लेझीम, लंगडी, रस्सीखेच, कबड्डी, पंजा लढवणे, रस्सीखेच आणि ढोल ताशा या क्रीडा आणि कला प्रकारांचे अंतिम सामने मालवणी येथील ‘क्रीडा भारती मैदान’ येथे झाले आणि पुरस्कार वितरणासह स्पर्धेचा नुकताच समारोप झाला.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, मुंबईत प्रथम पारंपरिक क्रीडा स्पर्धा महाकुंभ यशस्वीरित्या पूर्ण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ आयोजित केले होते.या स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली असून याबाबत त्यांनी प्रमाणपत्र ही वितरण केले आहे.
देशी खेळांच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेली तरुण पिढी घडवण्यास हातभार लावूया, देशाचे भविष्य घडविण्याची ताकद असलेले तरुण घडवण्यासाठी मदत होईल, असे श्री.लोढा यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी क्रीडा भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांसह सर्वांचे सहकार्य मिळाले.
अशी झाली श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा
छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभात मुंबईकरांना आश्चर्यचकित करणारे
, अंगावर रोमांच उभे करणारे आणि प्रेरणा देणारे अनेक क्षण अनुभवायला मिळाले. स्पर्धेच्या प्रत्येक भागात तितकीच चुरस होती. शिवकालीन खेळांचा असा महोत्सव प्रथमच मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. आजवर या क्रीडा महाकुंभात मध्ये १७ खेळांच्या स्पर्धा झाल्या असून त्यामध्ये दोन ते अडीच लाख खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन, गडकिल्ल्यांच्या सुबक आणि हुबेहूब प्रतिकृतीचे प्रदर्शन, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, ढोल ताशांच्या स्पर्धा अश्या अनेक लक्षवेधक गोष्टी नागरिकांच्या पसंतीस उतरल्या. पावनखिंड दौड या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण करण्याचा ८१ वर्षाच्या गृहस्थांचा तरुणांना लाजवेल असा उत्साह, शरीर सौष्ठेव स्पर्धेत दिव्यांग स्पर्धकांनी दाखवलेली जिद्द, प्रत्येक टप्प्यावर पुरुषांच्या तोडीस तोड स्पर्धा करणाऱ्या महिला असे अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले.