Breaking News

काँग्रेसचा सवाल, अंधेरीतील कामगार रुग्णालयात पूर्ण वैद्यकीय सेवा नसतानाही उद्घाटन का ? केवळ अर्धवट OPD विभाग सुरु करुन कामगारांच्या तोंडाला पाने पुसली

अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी सुरु करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी या विभागाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला पण हा विभागही पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. या रुग्णालयातील सर्व सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. हे रुग्णालय पूर्ववत सुरु व्हावे यासाठी कामगार संघटना पाठपुरावा करत आहेत, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे म्हणून रुग्णालय सुरु करत असल्याचा देखावा करून कामागारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा संताप कामगार व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी दिली.

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा म्हणाले की, २०१८ मध्ये या रुग्णालयाला आग लागून मोठी दुर्घटना झाली होती त्यांनतर या रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले पण रुग्णालय सुरु करण्यास मात्र चालढकल केली जात आहे. रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन, सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होतील अशी अपेक्षा होती परंतु पुन्हा एकदा विमाधारकांचा अपेक्षाभंग झाला आहे. शस्त्रक्रिया व आंतर रुग्ण विभाग यासाठी विमाधारकांना आताही कांदिवली रुग्णालयच गाठावे लागणार आहे. बाह्य रुग्ण विभागातील सेवा सुद्धा पूर्णपणे मिळतील का नाही याची शाश्वती नाही. बऱ्याच सुपरस्पेशालिटी सेवा येथे उपलब्ध नाहीत. सिटीस्कॅन, एम. आर. आय, 2D इको यासारख्या चाचण्या व रक्तपेढी सारख्या सुविधा ज्या २०१८ पूर्वी येथे उपलब्ध होत्या त्या देखील येथे लवकर सुरू होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अग्निशमन विभागाचीही पूर्ण परवानगी मिळालेली नाही. डॉक्टर व इतर वैद्यकीय स्टाफची भरतीही झालेली नाही त्यामुळे येथील सेवेवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

अंधेरी कामगार रुग्णालयाअंतर्गत असलेल्या ८ लाख कामगारांचे मागील ४ वर्षात ४ टक्के याप्रमाणे जवळपास ३ ते ३.५ हजार कोटी रुपये ESIC मध्ये जमा झाले पण अजून वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आलेली नाही. उद्घाटनासाठी आलेल्या पाहुण्यांच्या पंचतारांकित व्यवस्थेवरही लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आलेली आहे. या रुग्णालयावर २६० कोटी रुपये खर्च केला असून सर्व वैद्यकीय सुविधांनी युक्त अशा या रुग्णालयाचा २५ लाख लोकांना याचा लाभ होईल अशी मोठी जाहिरातबाजी सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्यानेच उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव, राज्य कामगार मंत्री रामेश्वर तेली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मान्यवरांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. हे प्रकरण मुंबईत उच्च न्यायालयात असून २३ ऑगस्ट रोजी सुनावणी असल्याने घाईघाईने रुग्णालय सुरु केल्याचा देखावा करण्यासाठी हे उद्घाटन करण्यात आले आहे, असे राजेश शर्मा म्हणाले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *