Breaking News

दिल्ली भेटीत मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ६ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला.

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली. सामान्य नागरिकांना सार्वजनिक दळणवळणाची सुविधा आरामदायी आणि गतिमान आवश्यक आहे या तळमळीतून मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या दिल्ली भेटीत त्यांनी ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो प्रकल्प किती गरजेचा आहे, हे सांगितले.

या भेटीत महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

विज्ञान भवनातील डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबतची बैठक आटोपून मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेचच केंद्रीय शहरे विकास मंत्री पुरी यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या भेटीत मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा झाली. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला असून त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी करतानाच मेट्रो कोचची संख्या वाढविण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सद्यस्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोच वाढविणे आवश्यक आहे. रिंग मेट्रोच्या प्रकल्प अहवालाला मान्यता देतानाच मेट्रो कोचची संख्या वाढवावी या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्रातील नागरी भागात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

 

असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प

एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

Check Also

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *