Breaking News

सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करणार: इर्शाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली इर्शाळवाडीला भेट

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला. शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल असा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला.

दिवसभरातील स्वातंत्र्य दिनानिमित्तचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री शिंदे यांचे सायंकाळी चारच्या सुमारास इर्शाळवाडीवासियांच्या तात्पुरत्या निवासाची सोय केलेल्या ठिकाणी आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी निवास व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही धरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.

गेल्या महिन्यात २० जुलैला इर्शाळवाडी दुर्घटना झाली होती. त्यातून बचावलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याठिकाणी करण्यात आली आहे. सुमारे ४२ कंटेरनरमध्ये या नागरिकांची सोय करण्यात आली आहे. शिवाय अन्य दहा कंटेनरमध्ये दवाखाना, अंगणवाडी, पोलिस नियंत्रण कक्ष, आपत्कालिन नियंत्रण कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ज्या दिवशी इर्शाळवाडी दुर्घटना घडली त्यादिवशी मुख्यमंत्री शिंदे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देखील दिवसभर त्याठिकाणी तळ ठोकून होते. मदत आणि बचावकार्यासाठी मुख्यमंत्री आवश्यक त्या सूचना देत होते एवढेच नाही तर प्रतिकुल परिस्थितीतही भर पावसात मुख्यमंत्री शिंदे चार तासांची पायपीट करून इर्शाळगडाजवळ जाऊन आले आणि दुर्घटनास्थळाची तसेच बचावकार्याची पाहणी करून आले.

या घटनेला महिना होण्याच्या आतच आज मुख्यमंत्री पुन्हा इर्शाळवाडीवासियांच्या भेटीसाठी आले. ज्यांनी आपल्या कुटुंबातील आप्तस्वकीयांना गमावले त्यांना आपुलकीने धीर दिला. दुर्घटनेची पडछाया अजून याठिकाणी कायम आहे परंतु आजच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवितानाचा स्वतः मुख्यमंत्री आपल्या पुनर्वसनासाठी भक्कमपणे पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी सातत्याने गावकऱ्यांच्या संपर्कात आहेत. जे जीव वाचलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम शासनातर्फे होत आहे याची प्रचिती आजच्या या दौऱ्यामध्ये दिसून आली.

स्वतः मुख्यमंत्री घरात जाऊन पाहणी करीत होते. ३६ क्रमांकाच्या घरातील गणपत पारधी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. सुविधांची पाहणी केली. तेथील चिमुकल्यांशी ते बोलले.. महिलांशी संवाद साधत त्यांचे दुःख जाणून घेतले. त्यांच्या समस्या समजावून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तिथेच सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
खुप अभ्यास कर मोठी हो..

एका घरात एक लहानगी अभ्यास करीत होती. तिच्याशी संवाद साधत खुप अभ्यास कर मोठी हो..असे सांगताना मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवून मुख्यमंत्र्यांनी तिला आशीर्वादच दिला. याठिकाणी इर्शाळवाडीवासियांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. त्यावर शासन नक्कीच उपाययोजना करेल अशी ग्वाही दिली. इथल्या प्रत्येक घरावर फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी अद्यापही दु:खातून न सावरलेल्या इर्शाळवाडीला मुख्यमंत्र्यांनी धीर आणि दिलासा दिला. त्यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी देखील उपस्थित होते.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *