Breaking News
83 percent water storage in seven lakes of Mumbai

पाणी टंचाई : मुंबईच्या सात तलावात फक्त ८३ टक्के पाणी साठा ! पाणी जपून वापरण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये एकंदरीत जलसाठा हा ८३.५१ टक्के आहे. प्रमुख तलावांपैकी सर्वात मोठे तलाव असणाऱ्या ‘अप्पर वैतरणा’ तलावातील जलसाठा ७१.०९ टक्के, तर भातसा तलावातील जलसाठा ७८.१६ टक्के आहे. मुंबईची पाणी चिंता काही प्रमाणात निश्चितपणे दूर झाली असली, तरी अद्याप पूर्णपणे मिटलेली नाही. विहार तलाव १०० टक्के व तुळशी तलाव ९९ टक्के भरलेला आहे. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या एकंदरीत पाणीपुरवठ्याचा विचार करता विहार व तुळशी तलावांमधील ‘जलसाठा’ हा अत्यल्प आहे. त्यामुळे या दोन तलावांमधील पाणीसाठ्याच्या आधारे व्यापक निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही असे पालिकेचे म्हणणे आहे.

दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असल्याचे जलअभियंता यांनी कळविले आहे. त्याचबरोबर काही तांत्रिक कारणांमुळे व परिरक्षणाच्या आवश्यकतांमुळे तलाव पूर्णपणे भरलेले नसताना देखील तलावांचे दरवाजे (गेट) काही प्रमाणात उघडावे लागतात. यंदाच्या पावसाळ्यात ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जलाशय’ अर्थात ‘मध्य वैतरणा’ तलावाचे २ दरवाजे या आठवड्यात उघडण्यात आले होते. त्यातून विसर्ग झालेले पाणी हे त्याच नदी प्रवाहात खालच्या बाजूला असणाऱ्या ‘मोडकसागर’ तलावात साठविण्यात आले. सदर पाणी हे तांत्रिक कारणांमुळे सोडण्यात आले होते. मात्र, काही माध्यमांनी त्याचा अर्थ तलाव ओसंडून वाहू लागला असा काढला. जो वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे पालिकेकडून हा खुलासा करण्यात आला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘व्हॉट्सॲप चॅटबोट’ आणि ‘आई’ महिला केंद्रित धोरण ॲप’मुळे पर्यटनाला गती

व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *