Breaking News

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला ‘हा’ महत्वाचा निर्णय ठाणे येथे राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशभरात आज ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे चालू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रूग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्यात येणार असल्याचा निर्णयही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, राज्यातील हे पहिले उद्यान कै. इंदिरा बाबुराव सरनाईक उद्यान, कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील ६ हजार चौरस मीटरच्या जागेवर तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. या उद्यानाची योग्य पद्धतीने देखभाल करण्यासाठी महापालिकेतर्फे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकाणी मोठ्या फलकावर लावण्यात येईल. अवयवदाना संदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येईल. त्यानंतर तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था या राजस्तरीय संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येईल.

अवयव दान ही काळाची गरज आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आल्यास अनेक जीव वाचण्यास मदत होणार आहे. यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या विषयवार अधिक व्यापक प्रमाणात जनजागृतीची व्हावी आणि अवयवदानासंदर्भात सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता ठाणे येथील उद्यान महत्वाचे असणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अवयवदानाचे अर्ज भरुन शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्ताने केले.

सध्याच्या घडीला एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत.

यात किडनी प्रत्यारोपणासाठी – ५,८३२,
लिव्हर प्रत्यारोपणासाठी – १,२८४,
हृदय प्रत्यारोपणासाठी – १०८,
फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी – ४८,
स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी – ३५,
छोटे आतडे प्रत्यारोपणासाठी – ३ एवढे रुग्ण प्रतिक्षेत आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हा महत्वाचा निर्णय

– यापुढे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, मंत्रिमंडळाने एकमताने घेतला निर्णय

– राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मिळाला मोठा दिलासा

– आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

– भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार

– प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital – नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मिळणार मोफत उपचार

– सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात

– राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत.

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *