Breaking News

शेअर बाजाराचे बिग बुल झुनझुनवाला यांनी अखेरचा घेतला निरोप; काय आहे पार्श्वभूमी? वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय शेअर बाजार आणि गुतंवणूक क्षेत्रातील बडे प्रस्थ तसेच शेअर मार्केटमध्ये बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी रूग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले होते. तेथेच सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

१९८५ साली भारतीय शेअर बाजारामध्ये त्यांनी केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी नुकतीच ‘अकासा’ ही एअरलाईन सुरू केली. ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.५ बिलियन डॉलर्स आहे. सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे स्वप्न भारतीय गुंतवणूकदारांना दाखवणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे झुनझुनवाला होते. शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले. यामुळेच मध्यमवर्गीयांचे राकेश झुनझुनवालांच्या टिप्पणीकडे, त्यांनी सुचवलेल्या शेअर्सकडे लक्ष असायचे.

राकेश झुनझुनवाला नेमके होते कोण?

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जून १९६० साली एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडिल आयकर अधिकारी होते. १९८६ साली कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स केवळ १५० अंकांवर होता. शेअर बाजारामध्ये त्यांनी पाच हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक आज कोट्यावधींच्या घरात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी सर्वात आधी ‘टाटा टी’ संदर्भात व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला आणि १९८६ साली त्यांना पाच लाखांचा नफा झाला. त्यांनी ४३ रुपयांना ‘टाटा टी’चे पाच हजार शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये या शेअर्सची किंमत १४३ रुपयांपर्यंत वाढली. त्यामुळेच त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तिपटीहून अधिक पैसा त्यांना या शेअरमधून मिळाला.

शेअर बाजारामध्ये ‘बिग बुल’ समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये मोठा नफा कमावला होता. त्यानंतर १९९२ साली उघडकीस आलेल्या घोटाळ्यामध्ये त्यांना मोठा फटका बसला होता.

एका मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी आपण शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवल्याचे कबूल केले होते. १९८७ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केले. अंधेरीत राहणाऱ्या रेखा या स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदार होत्या. २००३ साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडींग फर्म ‘रेअर एन्टरप्रायझेस’ची स्थापना केली. हे नाव त्यांनी पत्नीच्या आणि स्वत:च्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवले होते.

Check Also

आधार हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ बाजारात ८ मे रोजी येणार बाजारात

आधार हाऊसिंग फायनान्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) बुधवार, ८ मे २०२४ रोजी सुरू होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *