Breaking News

शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले “मॅग्नेटिक महाराष्ट्र” ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’

केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच येत्या ऑक्टोंबरमध्ये “मॅग्नेटिक महाराष्ट्र” ऑक्टोंबरमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, करूणाकर शेट्टी, आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील उद्योजक ही राज्याची ताकद आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेला उपस्थित असलेल्या जगभरातील अनेक उद्योजकांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली. अनेक उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शवली. या परिषदेत सुमारे एक लाख ३७ हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार झाले. केवळ सामंजस्य करार न करता त्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केलेली आहे. हे करार केवळ मुंबई, पुणे, नाशिक येथे नसून मराठवाडा, विदर्भाच्या दुर्गम भागाला प्रगतीकडे नेणारे आहेत. जमीन वाटप आणि इतर सुविधांची पूर्तता विभागामार्फत केली जात आहे.

देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा १५ टक्के वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात २० टक्के आणि परकीय गुंतवणुकीत सुमारे ३०टक्के एवढा वाटा आहे. राज्यात १२ लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. त्यांच्या माध्यमातून ९४ लाख लोकांना रोजगार मिळत आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून नव्याने सुमारे दीड लाख रोजगार तयार होणार आहेत. कौशल्य विकास विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहेत, विविध रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळत आहे. एकीकडे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन होत आहे, त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणुकीवर भर दिला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्ग हा एक हरित मार्ग आहे. या महामार्गामुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टेक्स्टाईल पार्क याठिकाणी गुंतवणूक करावी, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यभरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. मिसिंग लिंक कमी करून अंतर कमी केले जात आहेत. प्रवास वेगवान होत आहे. याचा फायदा उद्योगांना होणार आहे. नॅशनल पोर्टस विकसित करण्यासाठी ‘गती शक्ती ‘ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वेसाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये राज्याला दिले आहेत. सहकार क्षेत्रासाठी केंद्राने दहा हजार कोटी रूपयांचा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आणि त्यात राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग पूर्ण करण्यासाठी या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसह आपल्या सारख्या उद्योजकांचा हातभार लागणार आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना एक चांगले व्यासपीठ मिळते. जगभरातून आलेल्या रिटेलर्स व मोठ्या उत्पादकांना इथे विक्रीची संधी मिळते. आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असेही ते म्हणाले.

जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे ऑक्टोबरमध्ये आयोजन – उदय सामंत

उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांना वेळेत इन्सेन्टिव्ह आणि सबसिडी देण्यात येत आहे. २३०० कोटी इन्सेन्टिव्ह दिले. आणखी १५ दिवसांत २००० कोटी इन्सेन्टिव्ह देणार आहे. उद्योगांना त्वरित परवानग्या मिळण्यासाठी मैत्री कायदा लागू केला. ३० दिवसांत उद्योगांना लागणाऱ्या सर्व परवानग्या याद्वारे मिळू लागल्या आहेत. याचे अधिकार उद्योग विभागाच्या आयुक्तांना देण्यात आल्याने परवानग्या मिळण्यास अडचणी येत नाहीत. उद्योगाला पुढे नेणारे महाराष्ट्र राज्य आहे. यामुळे राज्य शासन जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन (MITEX) हे १७ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर आयोजित करण्यात आले. विविध उद्योगांतील सहभागींना एकाच छताखाली आणून ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते यंत्रसामग्रीपर्यंतचे प्रदर्शन येथे होत आहे. प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ असेल, अशी माहिती गांधी यांनी यावेळी दिली.

या प्रदर्शनात गुजरात, जम्मू – काश्मीर, राजस्थान, गोवा आणि परदेशातील उद्योजक सहभागी झाले आहेत. उत्पादन, वस्त्रोद्योग, हस्तकला आणि हातमाग, अंतर्गत आणि बाह्य, जीवनशैली, फॅशन, भेटवस्तू, लेखन साधने, प्रवास आणि पर्यटन, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यासारख्या विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या उत्पादनांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *