Breaking News

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला सविस्तर घटनाक्रमच सांगतो.. शिंदे गटाच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच केले भाष्य

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला २५ आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यावेळी या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेतेच असल्याची चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरु झाली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी कानावर हात ठेवत शिंदेंच्या बंडखोरीशी कोणताही संबध नसल्याचा सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीबाबत पहिल्यांदाच भाष्य करत म्हणाले, मी तुम्हाला सविस्तर घटनाक्रमच सांगतो असे स्पष्ट करत आम्ही भजन करायला पक्ष चालवत नसल्याचे सांगत संधीचा फायदा उचलल्याचे ठामपणे सांगितले.

एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील खुलासा केला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे आपल्यासोबत ४० आमदारांचा पाठिंबा घेऊन होते, अशा वेळी भारतीय जनता पार्टीने त्यांना सोबत घेत राज्यात सरकार स्थापन केलं. आम्हाला संधी होती, आम्ही त्याचा फायदा घेतला, यात गैर काय? असा प्रतिसवाल करत एकनाथ शिंदेच्या बंडखोरीचा फायदा घेतल्याचे स्पष्ट केले.

शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाहेर पडले याला तुमचा, भाजपाचा पाठिंबा होता का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी तुम्हाला सविस्तर घटनाक्रमच सांगतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २० जून रोजी एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत २९ आमदार होते. हे सर्वजण सुरतला गेले. ५५ पैकी २९ आमदार आणि गटनेते पक्षाबाहेर पडले होते. याचाच अर्थ शिंदेंसोबत जास्त आमदार होते. म्हणजेच पक्ष गटनेत्याजवळ होता. त्याच दिवशी आम्ही सरकार स्थापन केलं असतं. त्यानंतर २५ जूनपर्यंत म्हणजेच पुढच्या ५-६ दिवसात त्यांच्यासोबत ४० आमदार होते. आम्हाला संधी होती आम्ही त्याचा फायदा घेतला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही पाठीशी होतो का असं म्हणण्यापेक्षा लोक बाहेर पडले तर आम्ही काय भजन करायला पक्ष चालवत नाही. आम्हाला राजकारण करायचंच आहे. केवळ सत्तेचं नव्हे तर विकासाचं राजकारण आम्हाला करायचं आहे. एक व्यक्ती इतके आमदार सोबत घेऊन पक्षातून बाहेर पडला आहे आणि सत्ता स्थापन न करता भजन करत बसायचं असं शक्य नव्हतं. त्यामुळे राजकारणात जे योग्य होतं ते आम्ही केल्याचे सांगत भाजपाच्या कृतीचे समर्थन केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *