Breaking News

या शेतकऱ्यांना जाहिर झाला वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- कृषीमंत्री धनंजय मुंडे

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुसद येथे आयोजित करण्यात आलेल्या वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात केले.

पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी आमदार ॲड. निलय नाईक, आमदार इंद्रनिल नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, माजी नगराध्यक्ष अनिताताई नाईक, माजी राज्यमंत्री डॉ.एन.पी.हिराणी, बाबासाहेब नाईक कापूस सूत गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, राजेंद्र नजरधने, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हरितक्रांतीचे प्रणेत, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, वसंतराव नाईक यांचे कार्य अजरामर आहे. सलग बारा वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळतांना त्यांच्या काळात राज्यावर दुष्काळासारखे तीन संकट आले. या संकटांचे संधीत रुपांतरित करुन राज्यात हरितक्रांती घडवणे ही साधीसुधी बाब नाही. त्यांनी सुरु केलेली रोजगार हमी योजना राज्यात आजही सुरु आहे. या योजनेचे अनुकरण संबंध जगाला करावे लागले. दुष्काळाच्या संकटाला संधी मानून हरितक्रांती घडवणारा, असे वसंतराव नाईक यांचे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार कृषीमंत्री मुंडे यांनी यावेळी काढले.

कृषीभूषण पुरस्कार लवकरच जाहीर करणार

राज्य शासनाचे कृषीभूषण पुरस्कार येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल. भव्य कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

राज्यात एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच

राज्य शासनाने पंचामृत अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी १३०० रुपये मोजावे लागत होते ते आता एका रुपयात शेतकऱ्यांना विमा कवच देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. पीएम किसान योजनेंतर्गत ४५ लाख लोकांना लाभ मिळाला. ई-केवायसी, आधार लिंक, भूमि अभिलेखच्या अडचणींमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पहिल्या टप्याच्या लाभ दिला जाईल. नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार आहे, असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना पुन्हा सुरु करणार आहोत. मागेल त्याला शेततळे, शेडनेट, ठिबक सिंचनासाठी अर्ज करणाऱ्यांना लाभ दिला जाईल. खते, बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे कौतुक

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पुरस्कार दिला जातो, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

पुरस्कारार्थींची माहिती

पश्चिम महाराष्ट्रातील कपिल जयप्रकाश जाचक, (मु.पो. जाचकवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) बजरंग सदाशिव साळुंखे (मु.पो. बामणी, ता.सांगोला, जि. सोलापूर), उत्तर महाराष्ट्रातील विश्वास आनंदराव पाटील (मु.पो. लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव), महेंद्र निंबा परदेशी (मु.पो. कुसुंबा ता.जि. धुळे), मराठवाडा विभागातील बाळासाहेब नारायणराव पडूळ (मुपो लाडसावंगी, ता.जि. औरंगाबाद), अनिल तुळशीराम शेळके (मु.पो. कुंभेफळ, ता.जि.औरंगाबाद), कोकण विभागातील मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (मु.पो.लांजा, ता. लांजा जि. रत्नागिरी), संदिप बबन कांबळे (मु.पो. खानू, ता.जि. रत्नागिरी), विदर्भातील रवींद्र जयाजी गायकवाड ( मु.पो. गायवड, ता. कारंजा जि. वाशिम), अनिल शिवलाल किरणापुरे (मु.पो. लवारी, ता. साकोली, जि. भंडारा), कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॅा. दिगंबर मोकाट, वनस्पती विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महिला शेतकरी सविता वैभव नालकर (मु.पो. चिंचविहिरे ता. राहुरी जि. अहमदनगर) यांना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *