रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या ४ व ५ डिसेंबर, २०२३ रोजी भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपली असून, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंतर केंद्राकडून ४ व ५ डिसेंबर या दोन दिवसांसाठी पीक विमा पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी, तसेच आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती. ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली आहे.
दरम्यान ज्वारी, आंबा, काजू, संत्रा आदी उत्पादक शेतकरी विहित वेळेत आपला विमा भरु शकले नव्हते, त्यांनी ४ व ५ डिसेंबर दरम्यान आपला विमा भरुन प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.