Breaking News

घटनेतील ३७० वे कलम रद्द करण्याची तयारी दाखविल्याने मोदींची पोलादी छाती सिद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कौतुक

मुंबईः प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. या प्रस्तावामुळे एकीकडे विरोधक या निर्णयाला विरोध करत असले तरी आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया देत हे कलम रद्द करण्याचे धाडस दाखवित मोदींची पोलादी छाती सिध्द झाल्याचे कौतुकोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काढले.
निर्णयाचं स्वागत करताना शिवसेना भवानात शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना सांगितलं की, “हा खरंच एक ऐतिहासिक दिवस आहे. इतके दिवस जे स्वप्न या देशातला प्रत्येक नागरिक ह्दयाशी बाळगून होता ते पूर्ण झालं आहे”. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली. त्यांचंही हे स्वप्न होतं, जे पूर्ण झालं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं अभिनंदन करताना पोलादीपणा कायम आहे हे जगाला जाणवून दिलं असल्याचं म्हणत कौतूक केलं. पुढे त्यांनी म्हटलं की, “१५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन आहे. मात्र आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला. ज्या बेड्या शिल्लक होत्या. त्या या सरकारने आज तोडून टाकल्या आहेत”.
विरोध करणाऱ्यांना आवाहन करताना राजकीय जोडे बाजूला ठेवून देशाच्या सार्वभौमत्वाला महत्त्व द्यावं असं आवाहन केलं. “सार्वभौमत्वाच्या बाबतीत तडजोड होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी दक्षता घेऊ. हा निर्णय कोणत्या एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून, आपल्या देशाच्या एकसंघपणासाठी महत्त्वाचा आहे. त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे”, असं मतही त्यांनी व्यक्त करत आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *