Breaking News

उमेदवारही भाड्याने आणावे लागणा-यांनी उपदेश देऊ नये १५ लाख, दीडपट हमीभाव, दरवर्षी दोन कोटी कोटी नोकऱ्यांचे काय ते सांगा? अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाला नांदेडात माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला. त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही होईल. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये देशातील ज्वलंत प्रश्नांना बाजूला ठेवून लष्कराच्या नावावर मते मागण्याचा किळसवाणा प्रकार सुरु केला आहे. मागील पाच वर्षात राज्यात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. सरकारने मोठा गाजावाजा केलेली जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यभरात चार हजारांहून अधिक टँकर सुरु आहेत. तरीही जनतेला प्यायला पाणी मिळत नाही. या भीषण दुष्काळात सरकार शेतक-यांना आर्थिक मदत देऊ शकले नाही. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करू शकले नाही. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली असून या परिस्थितीतही आपण शेतक-यांसाठी खूप काही करीत असल्याचा आव आणताना मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

या सरकारने जाहीर केलेल्या बहुतांश योजनांच बोजवारा उडाला आहे. घोषणा करून दोन वर्ष झाली तरी, अजूनही राज्यातील शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट हमीभाव देण्याची घोषणा मोदींनी पाच वर्षापूर्वी केली होती. त्याचे काय झाले? ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र, मुद्रा योजना अशा अनेक योजनांची घोषणा केल्यानंतरही देशातील बेरोजगारी कमी का झाली नाही? पंधरा लाखांचे काय झाले? देशात किती स्मार्ट सिटी उभा राहिल्या? दरवर्षी दोन कोटी नोक-यांचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत असे प्रतिआव्हानही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *